![]()
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने (Bhandarkar Oriental Research Institute) शेतकऱ्यांसाठी प्राचीन कृषी पद्धतींवर आधारित एक अभ्यासक्रम विकसित केला आहे. या अभ्यासक्रमाद्वारे देशातील विविध भागांतील जमिनीचे प्रकार, हवामान आणि त्यानुसार होणारी शेती तस
.
हा अभ्यासक्रम पर्यावरणपूरक शेती, शेतीची कामे आणि मातीची पोत सुधारण्यासारख्या विषयांवर मार्गदर्शन करेल. प्राचीन भारतातील कृषी पद्धतीची सखोल माहिती शेतकऱ्यांना मिळावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. नांदेड येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या संयुक्त सहकार्याने हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिला जाईल.
कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. ते म्हणाले की, प्राचीन भारतीय शेतीचा अभ्यास अद्याप लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. या अभ्यासक्रमामुळे तळागाळातील शेतकऱ्यांना त्याची चांगली माहिती मिळू शकेल. हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच अभ्यासक्रम असून, शेतकऱ्यांसाठी एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे.
या संदर्भात दोन्ही संस्थांमध्ये नांदेड येथे सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण, संचालक व्यंकटराव कल्याणकर, कार्यकारी संचालक महेंद्र घोलप, वित्त व्यवस्थापक निलेश गाढे, सरव्यवस्थापक गजानन सबनीस तसेच भांडारकर संस्थेचे मनोज एरंडे आणि चिन्मय भांडारी उपस्थित होते.
याशिवाय, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि भांडारकर संस्थेमध्येही नुकताच एक सामंजस्य करार झाला. या करारानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासन नीती, मोडी लिपी आणि भारतीय ज्ञान परंपरा यांसारखे विषय विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना भांडारकर संस्थेद्वारे ऑनलाईन शिकवले जातील. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, संचालक डॉ. शैलेश वढेर आणि अधिष्ठाता एम. के. पाटील यावेळी उपस्थित होते.
भांडारकर संस्थेतर्फे विविध विषयांचे ऑनलाईन अभ्यासक्रम सातत्याने सुरू आहेत. अभ्यासकांनी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घ्यावी, असे आवाहन चिन्मय भांडारी यांनी केले आहे.