Headlines

National Teacher Award 2026 Winners List


‘शिक्षक’ हा केवळ वर्गात शिकवणारा घटक नसून समाजाची दिशा आणि पिढ्यांचे भविष्य बदलणारा मुख्य शिल्पकार असतो. आज 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून, शिक्षणातील निष्ठा, प्रयोगशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे देण्यात येणा

.

बीडच्या दुर्गम भागातील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातील ‘कोयता’ सोडवून त्यांना ‘कोडिंग’ शिकवणाऱ्या डॉ. कविता गित्ते(मुख्याध्यापिका, साने गुरुजी निवासी विद्यालय केज) गणितासारख्या क्लिष्ट विषयाला खेळाच्या माध्यमातून रंजक बनवणारे वैभव कुलकर्णी (जवाहर नवोदय विद्यालय, लातूर), विज्ञानातील प्रयोगांना थेट पेटंट आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत नेणारे साताराचे शिवप्रसाद टिंगरे (सैनिक शाळा) आणि नाशिकच्या महापालिका शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना थेट अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी जोडून जागतिक व्यासपीठ मिळवून देणाऱ्या कुंदा बच्छाव अशी या पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे आहेत. या चारही शिक्षकांनी आपापल्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे.

पारंपरिक चौकटींना फाटा देत, तंत्रज्ञानाची जोड आणि संवेदनशीलतेची झालर लावून या शिक्षकांनी हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमान केले आहे. शिक्षक दिनाच्या खास प्रसंगी, देशाच्या शैक्षणिक पटलावर महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या या चारही राष्ट्रनिर्मात्यांच्या उत्तुंग कार्याचा हा विशेष आढावा…

वंचित अन् शाळाबाह्य मुलांची सावली बनलेल्या डॉ. कविता गित्ते

केज (बीड): उसाच्या फडात, तांड्यांवर आणि दुर्गम वस्त्यांवर भटकणाऱ्या मुलांच्या हातातील ‘कोयता’ सोडवून त्यांच्या हातात ‘माऊस’ आणि पुस्तके देणाऱ्या बीड जिल्ह्यातील केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. कविता नरसिंगराव गित्ते यांना शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. वर्षानुवर्षे वंचित, उपेक्षित आणि शाळाबाह्य मुलांच्या आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या डॉ. गित्ते यांच्या या ध्येयवादी कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेल्याने संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हजारो मुलांना शाळेच्या प्रवाहात आणले

गेल्या 29 वर्षांपासून शिक्षण प्रसाराच्या पवित्र कार्यात अखंड कार्यरत असणाऱ्या डॉ. कविता गित्ते यांनी केवळ वर्गात शिकवण्यापुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात स्वतः उसाच्या फडात, भटक्यांच्या तांड्यांवर आणि वस्त्यांवर जाऊन त्यांनी पालकांचे मन वळवले आणि हजारो शाळाबाह्य बालकांना निवासी शाळेच्या प्रवाहात आणले. 2005 पासून त्यांनी शाळा सुटल्यानंतर दररोज एक तास पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानासाठी विशेष तासिका चालवल्या. इतकेच नव्हे, तर ग्रामीण भागातील मुलांनी काळाच्या पाऊलखुणा ओळखाव्यात म्हणून इयत्ता सहावीपासूनच वेल्डिंग, प्लंबिंग, हस्तकलेसोबतच थेट ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) लॅब उभारून मुलांना कोडिंग व रोबोटिक्सचे प्रगत धडे दिले. याशिवाय, सांडपाण्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय भाज्या पिकवत मुलांच्या पोषण आहारात त्यांचा समावेश करणारा अनोखा पर्यावरणपूरक प्रयोगही त्यांनी शाळेत यशस्वी केला.

समुपदेशनाच्या माध्यमातून मानसिकता बदलली

सामाजिक बांधिलकी जपताना त्यांनी शेकडो मुलींचे बालविवाह रोखत पथनाट्य आणि समुपदेशनाच्या माध्यमातून समाजाची मानसिकता बदलण्याचा मोठा प्रयत्न केला. त्यांच्या या अहोरात्र धडपडीमुळे तब्बल 10 हजारांहून अधिक मुलांचे शिक्षण पूर्ण झाले असून 4-5 वर्षे शिक्षणापासून वंचित राहिलेली मुले आज प्रवाहाचा भाग बनली आहेत. बालविवाहाच्या दाढेतून मुक्त झालेल्या अनेक मुली आज सुरक्षित वातावरणात बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करत आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे शाळेला ‘आयएसओ’ (ISO) मानांकन मिळाले, ‘माझी सुंदर शाळा’ अभियानात जिल्ह्याचे प्रथम पारितोषिक मिळाले, तर शाळेतील खेळाडूंनी सॉफ्टबॉल आणि बेसबॉल स्पर्धांमध्ये 210 हून अधिक पदके मिळवून चमकदार कामगिरी केली.

कोयता बंद, माऊस हाती अभियान

भविष्यात ‘कोयता बंद, माऊस हाती अभियान’ अधिक तीव्र करणे, व्यसनमुक्ती केंद्र उभारणे आणि ऊसतोड कामगारांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासकीय हक्क मिळवून देणे हा त्यांचा संकल्प आहे. “ज्या मुलांच्या जन्माची नोंद उसाच्या फडात होते, त्यांच्या कर्तृत्वाची नोंद उद्या देशातील मोठे अधिकारी आणि नामांकित खेळाडूंच्या यादीत व्हावी, हाच माझ्या आयुष्याचा ध्यास आहे,” या डॉ. गित्ते यांच्या शब्दांतून त्यांच्या कार्याची उत्तुंग निष्ठा दिसून येते.

लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयाचे गणिताचे जादूगार वैभव कुलकर्णी

लातूर: अनेक विद्यार्थ्यांना वाटणारी गणिताची भीती दूर पळवून, खेळातून अन् आनंदाने हा क्लिष्ट विषय आत्मसात करायला शिकवणारे लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे शिक्षक वैभव वसंतराव कुलकर्णी यांची यंदाच्या प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’साठी निवड झाली आहे. अमूर्त वाटणाऱ्या गणितीय संकल्पनांना सोप्या, कृतिशील आणि रंजक रूपात मांडून शिक्षणात आधुनिकतेचा मेळ घालणाऱ्या कुलकर्णी यांच्या या राष्ट्रीय सन्मानामुळे मराठवाड्याच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कठीण संकल्पना सोप्या करून शिकवल्या

गणिताला केवळ परीक्षांपुरते मर्यादित न ठेवता त्याला अनुभवाधारित बनवणे, हे वैभव कुलकर्णी यांच्या अध्यापनाचे मुख्य वैशिष्ट्य राहिले आहे. पायथागोरसचे प्रमेय, समांतर रेषा किंवा अनुरूप कोन यांसारख्या कठीण समजल्या जाणाऱ्या संकल्पना त्यांनी क्रीडा, कथाकथन, खेळणी आणि कलेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना अत्यंत सहजतेने उकलून दाखवल्या. त्यांचे हे प्रयोग केवळ वर्गखोलीपुरते सीमित राहिले नाहीत; तर डिजिटल क्रांतीचा स्वीकार करत त्यांनी ‘मॅथ्स मेड इझी विथ वैभव कुलकर्णी’ या आपल्या यूट्यूब वाहिनीवरून ७०० हून अधिक शैक्षणिक व्हिडिओंची निर्मिती केली. इयत्ता नववी आणि दहावीच्या ‘एनसीईआरटी’ (NCERT) अभ्यासक्रमावर आधारित सराव प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न आणि क्षमताधारित प्रश्नांची मालिका त्यांनी डिजिटल माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली.

शिक्षकांना दिले अध्यापनाचे धडे

केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर शिक्षकांना सक्षम बनवण्यासाठी कुलकर्णी यांनी मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत त्यांनी स्वतःची नाविन्यपूर्ण अध्यापनपद्धती पोहोचवली आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून जवळपास 20 विशेष प्रशिक्षण सत्रे आयोजित करून त्यांनी 800 हून अधिक शिक्षकांना कमी खर्चातील अध्यापनसाहित्य आणि डिजिटल साधनांचा वापर करण्याचे धडे दिले. त्यांच्या या प्रयोगशील अध्यापनामुळे विद्यार्थ्यांची गणितातील आवड तर वाढलीच, शिवाय गेल्या पाच वर्षांत त्यांच्या शाळेने 100 टक्के निकालाची दैदीप्यमान परंपराही राखली आहे.

आनंददायी शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवणार

आपल्या या गौरवशाली यशावर माध्यमांशी बोलताना वैभव कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले की, ‘हा पुरस्कार म्हणजे केवळ वैयक्तिक सन्मान नसून नाविन्यपूर्ण अध्यापन, शिक्षक सक्षमीकरण आणि डिजिटल शिक्षणातील योगदानाला मिळालेली राष्ट्रीय पोचपावती आहे. भविष्यातही गणितातील आनंददायी शिक्षणाचा हा प्रवास अविरत सुरू ठेवत नव्या संकल्पना मांडण्याचा आणि शिक्षण अधिक परिणामकारक व सर्वसमावेशक बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.’

सातारा सैनिकी शाळेचे प्रयोगशील शिक्षक शिवप्रसाद टिंगरे

सातारा: शिक्षणाकडे केवळ पुस्तकी चौकटीतून न पाहता विद्यार्थ्यांना विज्ञानाची खरी गोडी लावणारे आणि त्यांच्यातील संशोधक वृत्तीला पैलू पाडणारे सातारा येथील सैनिक स्कूलचे शिक्षक शिवप्रसाद अरविंद टिंगरे यांची यंदाच्या प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’साठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पारंपरिक अध्यापन पद्धतीला फाटा

शिवप्रसाद टिंगरे यांनी वर्गातील पारंपरिक अध्यापन पद्धतीला फाटा देत विज्ञान विषयात अनेक नावीन्यपूर्ण आणि कृतिशील प्रयोग राबवले आहेत. त्यांनी विकसित केलेले ‘लर्निंग एनेबल्ड रिव्हिजन मॉडेल’ (अध्ययन सुलभ पुनरावर्तन प्रारूप) हे शून्य खर्चात खेळाच्या माध्यमातून उजळणी घेणारे एक अनोखे मॉडेल ठरले आहे. खेळ, प्रश्नमंजूषा स्पर्धा आणि गुणफलकांच्या (लीडरबोर्ड) साहाय्याने त्यांनी उजळणी प्रक्रिया रंजक बनवून विद्यार्थ्यांमधील विज्ञानाची भीती पूर्णपणे घालवली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासासोबतच समस्या सोडवण्याची क्षमता आणि सर्जनशीलता वृद्धिंगत झाली आहे.

विद्यार्थ्यांना कल्पनेकडून कृतीकडे नेले

शालेय स्तरावर नवउपक्रम परिषद, विज्ञान क्लब आणि प्रयोगशीलता दिवसांच्या आयोजनातून टिंगरे यांनी विद्यार्थ्यांना कल्पनेकडून प्रत्यक्ष कृतीकडे नेण्याचे काम केले. केवळ कल्पना न मांडता तिचे रूपांतर प्रत्यक्ष उपयोगात येणाऱ्या प्रतिकृतींमध्ये (प्रोटोटाइप) कसे करायचे, याचे धडे त्यांनी दिले. त्यांच्या याच मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘न्यूट्रिस्टोव्ह’सारख्या प्रयोगाला पेटंट मिळवण्यापर्यंत यश मिळाले. ‘इन्स्पायर-मानक’, साकुरा सायन्स प्रोग्राम, युवा आयडियाथॉन आणि विकसित भारत बिल्डाथॉन यांसारख्या भव्य राष्ट्रीय व्यासपीठांवर सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मारलेली मजल ही टिंगरे यांच्या दूरदृष्टीची पावती आहे.

त्यांचे हे शैक्षणिक कार्य केवळ स्वतःच्या शाळेपुरते सीमित राहिले नाही. ‘पीएम ई-विद्या-स्टार्स’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत त्यांनी दहावीच्या विज्ञान विषयासाठी तयार केलेले डिजिटल अध्ययन साहित्य आज राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा मुख्य आधार बनले आहे.

अल्पखर्चात विज्ञान-तंत्रज्ञान पोहोचवणे उद्दिष्ट

आपल्या आगामी वाटचालीबद्दल बोलताना शिवप्रसाद टिंगरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण अधिक व्यक्तिकेंद्रित व रंजक बनवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. ग्रामीण व वंचित घटकांतील बालकांपर्यंत अल्पखर्चात विज्ञान-तंत्रज्ञान पोहोचवणे, विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना ‘प्रोटोटाइप ते प्रॉडक्ट’ असा व्यावसायिक आयाम देणे आणि एनडीए (NDA) सह इतर स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना यशाच्या शिखरावर नेणे यासाठी ते कटिबद्ध आहेत. विद्यार्थी केंद्रित इनोव्हेशन लॅब आणि व्यक्तिमत्त्व विकासाची नवी प्रारूपे उभारून नव्या पिढीला भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करण्याचा त्यांचा मानस आहे.

नाशिकच्या महापालिका शाळेतील उपक्रमशील शिक्षिका कुंदा बच्छाव

नाशिक: शिक्षणातील प्रयोगशीलता आणि संवेदनशीलतेच्या बळावर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या नाशिक येथील शिक्षिका कुंदा जयवंत बच्छाव यांना यंदाचा सर्वोच्च ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. आनंदवली येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यामंदिर (महापालिका शाळा क्रमांक 18) येथे कार्यरत असणाऱ्या कुंदा बच्छाव यांनी आपल्या अनोख्या कार्यशैलीने महापालिकेच्या शिक्षणव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून दाखवला आहे.

अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी संवादाची संधी

वर्गातील चार भिंतींच्या पलीकडे जाऊन शिक्षण देण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन कुंदा बच्छाव यांनी ‘जॉयफुल स्टेम’ (JOYFUL STEM), ‘ज्ञानभिंती’ आणि ‘ई-ट्विनिंग ते इस्रो’ (ISRO) यांसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. विशेषतः, त्यांच्या ‘ई-ट्विनिंग’ या विशेष उपक्रमामुळे मनपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची अद्भूत संधी मिळाली. यामुळे परदेशात जाणे शक्य नसलेल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जगाची दारे थेट त्यांच्या वर्गखोलीतच उघडली गेली. विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी ‘मिशन मोबाईल-मुक्ती’, ‘आनंददायी शिक्षण कट्टा’, खुले वाचनालय आणि क्यूआर-आधारित शैक्षणिक साधनांची निर्मिती करून मुलांचे मन पुस्तके, संगीत, खेळ आणि सर्जनशीलतेकडे वळवले.

गळती रोखण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर

या प्रयोगांचे फलित म्हणजे विद्यार्थ्यांच्या वर्तनात आणि शिकण्याच्या पद्धतीत एक सकारात्मक परिवर्तन घडले आहे. मुलांची वाचनाची आवड वाढली असून त्यांच्यात आत्मविश्वास आणि प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती विकसित झाली आहे. केवळ अभ्यासावरच भर न देता, मुलींच्या शिक्षणातील गळती रोखण्यासाठी त्यांनी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करत निधी उभा केला आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील 150 हून अधिक मुलींचे शिक्षण पुन्हा सुरू ठेवण्यास मोलाचा हातभार लावला.

जिद्दीच्या जोरावर मोठा बदल घडवता येतो

आपल्या आगामी वाटचालीबद्दल माध्यमांशी बोलताना कुंदा बच्छाव यांनी व्यक्त केले की, नाशिक महानगरपालिकेची शाळा गुणवत्ता, आधुनिकता आणि संवेदनशीलतेचे एक देशासमोरील आदर्श मॉडेल म्हणून उभी राहावी, हाच त्यांचा ध्यास आहे. भविष्यात अनुभवात्मक शिक्षण, भाषा समृद्धी, कला-क्रीडा आणि जागतिक नागरिकत्वाच्या संकल्पनांचा अधिक विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे. साधने कमी असली तरी कल्पकता आणि जिद्दीच्या जोरावर मोठा बदल घडवता येतो, असा विश्वास व्यक्त करत ‘माझ्या कामातून किती शिक्षक प्रेरित झाले आणि किती विद्यार्थी घडले, यातच माझ्या कार्याचे खरे यश असेल’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *