Headlines

NEET परीक्षेतील अपयश जिव्हारी!:नैराश्यातून विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, उंदीर मारण्याचे औषध खाऊन संपवले जीवन




‘नीट’ परीक्षेत आलेले अपयश आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेरे येथील समीक्षा दीपक पवार या 18 वर्षीय विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. विषारी औषध घेतल्यानंतर तिला कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र सोमवारी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, समीक्षाने गेल्या वर्षी 4 मे 2025 रोजी वैद्यकीय प्रवेशासाठीची ‘नीट’ परीक्षा दिली होती. मात्र, या परीक्षेच्या निकालात तिला अपेक्षित यश मिळाले नाही. या अपयशामुळे ती मागील काही महिन्यांपासून प्रचंड मानसिक तणाव आणि नैराश्याचा सामना करत होती. नेमके काय घडले? याच वाढत्या नैराश्यातून तिने 23 जुलै रोजी घरात असलेल्या उंदीर मारण्याच्या विषारी वड्या खाल्ल्या. सुरुवातीला तिने या प्रकाराबाबत घरात कोणालाही काहीच सांगितले नाही. मात्र, दोन दिवसांनंतर विषाचा शरीरावर तीव्र परिणाम होऊ लागल्याने तिला पोटदुखीचा प्रचंड त्रास सुरू झाला. वेदना असह्य होऊ लागल्यानंतर अखेर तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी 26 जुलै रोजी समीक्षाला उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात तातडीने दाखल केले. तिथे तिच्यावर अतिदक्षता विभागात शर्थीचे उपचार सुरू होते. मात्र, विष संपूर्ण शरीरात भिनल्याने उपचारांना यश आले नाही आणि सोमवारी तिची दुर्दैवी प्राणज्योत मालवली. संपूर्ण परिसरात मोठी शोककळा या धक्कादायक घटनेमुळे शेरे गावासह संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी प्रसंगामुळे वैद्यकीय व इतर स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थ्यांवरील वाढता ताण आणि त्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या घटनेची नोंद मसूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *