![]()
पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व येथील शिरगाव परिसरात एका खदानीत आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, हे भीषण हत्याकांड मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या डोळ्यांदेखत घडले असून, हल्लेखोरांनी त्यांनाही जखमी करत त्यांच्या शासकीय वाहनाची मोठी तोडफोड केली आहे. याप्रकरणी खदान मालक महेश भोईर याचे नाव प्राथमिक तपासात समोर आले असून, भरदिवसा घडलेल्या या थरारक हत्याकांडाने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या विरार पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या घटनेतील मृत व्यक्तीची ओळख आत्माराम पाटील अशी पटली असून, ते विविध प्रकरणांत माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करून सातत्याने पाठपुरावा करणारे सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित होते. प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली असून, या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. वाहनाचीही तोडफोड मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास माहिती अधिकार कार्यकर्ते आत्माराम पाटील आणि वसई तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील हे शिरगाव येथील खदानीच्या परिसरात आपल्या व्हॅगनआर कारने गेले होते. तेथे पोहोचताच खदान मालक महेश भोईर याने त्यांच्याशी वाद घालत सुरुवातीला त्यांच्या वाहनाची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील जखमी या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले आणि आत्माराम पाटील यांच्यावर दगडाने जीवघेणा प्रहार करण्यात आला, ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यात मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील हे देखील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिस अधिक तपास करत आहेत. हत्येचे कारण अस्पष्ट या हत्येचे मूळ खदानीशी संबंधित वादात आहे की अन्य कोणत्या कारणास्तव हा हल्ला झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसून पोलीस सध्या सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. भरदिवसा घडलेल्या या क्रूर हत्याकांडाने विरार आणि आसपासच्या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, यानिमित्ताने माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Source link
RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या:मंडळ अधिकाऱ्याच्या डोळ्यांदेखत घडला थरार, विरारमधील घटनेने खळबळ