“मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे भारतीय जनता पक्षाचे हस्तक आणि एजंट म्हणून काम करत असून देशात उघडपणे लोकशाहीची हत्या केली जात आहे. संसदेत 300 खासदारांना बोलू दिले जात नाही आणि रस्त्यावर उतरलो तर सीमेवरून सशस्त्र सैन्य आणि बीएसएफच्या तुकड्या आणू
.
सुप्रीम कोर्टाने कान उपटले; खोट्या माणसाला खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “मतदार यादीतील ‘फॉर्म 6’ मधील नियमबाह्य बदलांबाबत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचे चांगलेच कान उपटले आहेत. सर्वोच्च न्यायालयाला पूर्णपणे अंधारात ठेवून आणि न्यायालयात खोटे बोलून हे बदल करण्यात आले. जी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च न्यायालयाशी खोटे बोलते, त्या व्यक्तीला मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या खुर्चीवर बसण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही.”
एकमताशिवाय मनमानी कारभार
“निवडणूक यंत्रणेत आणि मतदान पद्धतीमध्ये बहुमताशिवाय किंवा सहमतीशिवाय केलेले फेरबदल अत्यंत धक्कादायक आहेत. जितके दिवस ज्ञानेश कुमार त्या खुर्चीवर राहतील, तितके दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे अधःपतन होत राहील. ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिलाच पाहिजे.”
300 खासदारांना घाबरणारे सरकार; सीमेवरचे सैन्य रस्त्यावर आणले!
विरोधी खासदारांच्या मोर्चाला रोखण्यासाठी दिल्लीत उभारण्यात आलेल्या बंदोबस्तावर राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला, “संसदेपासून निर्वाचन सदनपर्यंत संपूर्ण रस्त्यांवर बॅरिकेड्स, नाकाबंदी आणि सीमा सुरक्षा बल (BSF) तसेच सीआयएसएफच्या सशस्त्र जवानांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सीमेचे रक्षण करणाऱ्या सैन्याला स्वतःच्याच देशातील खासदारांना रोखण्यासाठी उभे केले आहे. 300 खासदारांना एवढे घाबरणारे सरकार यापूर्वी कधी पाहिले नव्हते.”
ज्ञानेश कुमारांच्या दालनात जाणार
“आम्ही सर्व खासदार सकाळी 11 वाजता संसदेतून पायी निघून निर्वाचन सदनकडे मार्च करणार आहोत. ज्ञानेश कुमार जर पळून जाऊन भूमिगत झाले नाहीत, तर त्यांच्या दालनात जाऊन त्यांना देशाच्या लोकशाहीशी प्रतारणा केल्याबद्दल जाब विचारू.”

मतभेद विसरून ‘आप’ने एकत्र यावे; ही राष्ट्रीय लढाई आहे
विरोधी पक्षांच्या एकजुटीवर आणि आंदोलनाच्या स्वरूपावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले. “निवडणूक आयोगाचा भ्रष्टाचार, मतचोरी आणि ईव्हीएम घोटाळा हा केवळ एका पक्षाचा विषय नसून देशाच्या संविधानाचा प्रश्न आहे. स्वातंत्र्यलढ्यात जसे काँग्रेस, डावे, कम्युनिस्ट आणि समाजवादी एकत्र आले होते, तसेच आता प्रत्येकाने अहंकार व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या लढाईत एकत्र आले पाहिजे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही (AAP) या आंदोलनात पूर्ण ताकदीने सहभागी व्हावे, कारण ते स्वतः या जुलमी व्यवस्थेविरोधात लढले आहेत आणि तुरुंगात गेले आहेत.”
काँग्रेसच्या देशव्यापी मोहिमेला पाठिंबा
“काँग्रेसने जाहीर केलेल्या ‘देश बचाव, वोट बचाव’ मोहिमेत ‘इंडिया’ आघाडी एकत्रपणे काम करेल. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वात गर्जना मोर्चा निघाला, तेव्हाही सर्व घटक पक्षांना सोबत घेण्यात आले होते.”
महाराष्ट्रात दुष्काळ, अन् विधान परिषदेच्या एका जागेसाठी मोदींकडे एक तास खलबते!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याच्या मुद्द्यावरून राऊत यांनी जोरदार टोला लगावला. “महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ आहे, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे, तरुण रस्त्यावर उतरले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत राष्ट्रीय समस्यांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याऐवजी, देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना विधान परिषदेच्या एका जागेसाठी एक-एक तास वेळ देतात! यावरून स्पष्ट होते की पंतप्रधानांना काही काम नाही आणि उपमुख्यमंत्र्यांना दुसरा कोणताही उद्योग राहिलेला नाही.”
“आमच्या शिवसेनेचे मुख्यालय ‘मातोश्री’वर आहे, मात्र यांच्या पक्षाचे हेडक्वार्टर दिल्ली आणि गुजरातमध्ये असल्याने त्यांना तिकिटासाठी दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत.”
एमपीएससी आंदोलनात फूट पाडण्याचा फडणवीसांचा कट; आदित्य ठाकरे पुण्यात जाणार
पुण्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य करताना ते म्हणाले, “पुण्यात हजारो विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. मी स्वतः तिथे जाऊन विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या आंदोलनात जाती-जिल्ह्यांच्या नावाखाली फूट पाडण्याचा हीन प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडून सरकारला काहीही साध्य होणार नाही; त्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य कराव्याच लागतील.”
आदित्य ठाकरे आंदोलनाला भेट देणार
“या आंदोलनाचे नेतृत्व आमदार रोहित पवार सक्षमपणे करत आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे स्वतः आज पुण्यात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत,” असे सांगत राऊत यांनी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
——————————————————-
हेही वाचा…
MPSC अध्यक्ष भिमनवारांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला :रोहित पवारांचा दावा, म्हणाले- विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आता इगोचा खेळ बनला

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेले सत्याग्रह आंदोलन आता अधिकच आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनात एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘भिवनवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असून, आता हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या हिताचा न राहता केवळ मुख्यमंत्र्यांच्या ‘इगो’चा खेळ बनला आहे,’ असा थेट आरोप त्यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी