काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील आक्षेपार्ह मजकुराचा निषेध करताना पत्रकार परिषदेत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेले पान फाटल्याच्या वादावरून शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट करत
.
नेमका वाद काय होता?
बुधवारी (18 नोव्हेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत पुस्तकाची पाने फाडली होती. यादरम्यान, शायना एन. सी. यांच्या हातून फाडल्या गेलेल्या पानावर बाळासाहेब ठाकरे मणिशंकर अय्यर यांना जोडे मारत असल्याचा फोटो होता. या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका करत बाळासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप केला होता.
बाळासाहेब माझ्या लग्नालाही आवर्जून उपस्थित राहिले होते; शायना एन. सी. भावुक
आपल्या ट्विटमधून शायना एन. सी. यांनी ठाकरे कुटुंबाशी असलेल्या जुन्या आणि जिव्हाळ्याच्या कौटुंबिक संबंधांना उजाळा दिला आहे. मी लहान असताना पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटले. ते माझ्या वडिलांचे अत्यंत जिवलग मित्र होते आणि आमच्या कुटुंबाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वर्षे त्यांचा अखंड सहवास आणि आशीर्वाद आम्हाला लाभले. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी, म्हणजेच माझ्या लग्नालाही बाळासाहेब आवर्जून उपस्थित राहिले होते.
हिंदुत्व आणि सावरकरांचे निस्सीम चाहते
बाळासाहेब हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे एक अद्वितीय आणि तेजस्वी नेतृत्व होते. प्रखर देशभक्त, कट्टर आणि अभिमानी हिंदू, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते निस्सीम चाहते होते. हिंदुत्वाच्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही आणि काँग्रेसच्या विचारधारेविरोधात कायम ठाम व निर्भीड भूमिका घेतली.
कृतीचा जाणीवपूर्वक विपर्यास
कालच्या पत्रकार परिषदेत मी बाळासाहेबांच्या विचारांचाच संदर्भ दिला होता; मात्र माझ्या कृतीचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. बाळासाहेबांचा अनादर करण्याचा माझा हेतू कधीच नव्हता, उलट मी त्यांच्या ज्वलंत विचारांतूनच प्रेरणा घेते.
निष्ठा सिद्ध करण्यासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही
या प्रकरणाचे भांडवल करणाऱ्या विरोधकांवर शायना एन. सी. यांनी अत्यंत तिखट शब्दांत पलटवार केला आहे. “ज्यांनी माझ्या या कृतीचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मला ठणकावून सांगायचे आहे की, बाळासाहेबांवरचे माझे प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. सत्ता आणि स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्यांनी मला बाळासाहेब शिकवू नयेत. काही नाती आणि ऋणानुबंध तुमच्या सत्तेच्या व स्वार्थाच्या राजकारणापलीकडे असतात,” अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला सुनावले. बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी हीच माझी खरी ताकद असून, ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा अर्पण केला आहे.
————————————————–
हेही वाचा…
20 वर्षे काँग्रेसमध्ये पदे भोगताना सावरकरांचा अपमान दिसला नाही का?:सोनिया गांधींचे पुस्तक फाडणाऱ्या शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची अखिल चित्रेंनी काढली कुंडली

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत पुस्तकाची पाने फाडल्यानंतर आता या वादाला नवे वळण मिळाले आहे. ज्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधींवर टीका केली, त्यातील प्रमुख सूत्रधार हे स्वतः अनेक दशके काँग्रेसमध्येच कार्यरत होते, याची आठवण करून देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते अखिल चित्रे यांनी शिंदे गटावर जोरदार पलटवार केला आहे. समाजमाध्यम ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत चित्रे यांनी संजय निरुपम, आनंद दुबे आणि सुशिबेन शहा यांच्या जुन्या काँग्रेस कारकीर्दीचा पाढा वाचत, “राजकीय सोयीनुसार जागे होणारे हे सावरकरप्रेम आहे,” असा सणसणीत टोला लगावला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी