Headlines

The construction of Lord Jagannath’s chariot will begin with the golden axe touching the wood.


  • Marathi News
  • National
  • The Construction Of Lord Jagannath’s Chariot Will Begin With The Golden Axe Touching The Wood.

प्रियांका साहू | पुरी16 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

रथनिर्मितीमध्ये गुंतलेले सेवायत रोज १४ तास काम करणार; रथात ना खिळा, ना मशीनचा वापर

ओडिशामधील पुरीच्या जगप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराची रथयात्रा यंदा १६ जुलै रोजी निघणार आहे. यासाठी रथनिर्मितीचा शुभारंभ सोमवारी अक्षय्य तृतीयेला होणार आहे. श्री मंदिराच्या (मुख्य मंदिर) जवळ रथ खला कॅम्प बनवण्यात आला आहे. येथे विश्वकर्मा महाराणा, रूपकार आणि इतर सेवायत काम सुरू करतील. श्री मंदिरासमोर बनवलेल्या विशेष यज्ञकुंडात आहुती दिल्या जातील. माता दक्षिण कालीच्या मंत्राने अभिमंत्रित केलेल्या सोन्याच्या ३ कुऱ्हाडी आणल्या जातील. पुरोहित तिन्ही लाकडांना या कुऱ्हाडींनी स्पर्श करतील. यासोबतच रथनिर्मिती सुरू होईल.

रथ बनवण्यामध्ये ६० विश्वकर्मा महाराणा, ८० भोई सेवायत, १५ लोहार, २० ते ३० चित्रकार, १० शिंपी आणि १५ ते २० रूपकार सेवायत सहभागी असतील. हे अगदी शास्त्रात लिहिल्याप्रमाणेच बनवले जातील. सर्वात आधी चाके बनवली जातील. यासाठी भगवान जगन्नाथांच्या नंदीघोष रथाचे मुख्य महाराणा विजय महापात्र, बलभद्र यांच्या तालध्वज रथाचे मुख्य महाराणा नृसिंह महापात्र आणि देवी सुभद्रेच्या देवदलन रथाचे मुख्य महाराणा नारायण रोज देवी माता चर्चिकाची परवानगी घेतील. यानंतरच काम सुरू केले जाईल. रथनिर्मिती पूर्ण होईपर्यंत असे रोज केले जाईल.

नृसिंह महापात्र यांनी दिव्य मराठीला सांगितले की, रथनिर्मिती सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत चालेल. काही सेवायत बाहेर नोकरी करतात, पण रथनिर्मिती सुरू झाल्यावर ते येथे येतात. या प्रक्रियेत सहभागी असलेले सर्व सेवायत या काळात शुद्ध शाकाहारी जेवण करतात. बाहेरचे जेवण बंद असते. घरात कांदा-लसूणही आणत नाहीत. आम्ही दिवसातून फक्त एकदाच भात खातो.

भोई सेवायतांचे सरदार रबी भोई यांच्या मते, रथ बनवताना कोणताही खिळा, मशीन किंवा लाकूड कटरचा वापर होत नाही. यासाठी फक्त निहाण, करवत, रंधा आणि हातोडाच वापरला जातो. सेवायतांची दिनचर्या खूप कठीण असते, पण रथ कधी तयार होतात, हे समजूनही येत नाही. रथनिर्मितीसाठी ८६५ लाकडांची आवश्यकता आहे. गेल्या वर्षीची ४७ लाकडे शिल्लक आहेत, त्यामुळे यंदा ८१८ लाकडेच लागतील. जिल्हाधिकारी दिव्यज्योती परिडा यांच्या मते, रथनिर्मिती ७ जुलैपर्यंत चालेल.

मुंबईच्या मिलमधून येणार ४ रंगांचे दीड हजार मीटर कापड

तिन्ही रथ तयार झाल्यानंतर शिंपी एका विशेष तिथीला रथाचे कापड शिवण्याचे काम सुरू करतील. मुंबईच्या सेंच्युरी कापड मिलमधून लाल, पिवळ्या, हिरव्या आणि काळ्या रंगाचे एक हजार ते दीड हजार मीटर कापड आणले जाईल. हे कापड इतके असते की तिन्ही रथ पूर्णपणे झाकले जातील. परंपरेनुसार नंदीघोष रथासाठी लाल आणि पिवळे, बलभद्र यांच्या रथासाठी लाल आणि हिरवे, तर सुभद्रा यांच्या रथासाठी लाल आणि काळ्या रंगाचे कापड शिवले जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *