Headlines

नेवासे येथील उपनगराध्यक्षांच्या पतीचा मुख्याधिकाऱ्यावर कट्ट्याने गोळीबार:‘ट्रिगर’ अडकल्याने बचावले, हल्ल्याच्या 6 दिवसांनंतर गुन्हा दाखल




नेवासे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी (सीओ) निखिल लक्ष्मण फराटे यांच्यावर उपनगराध्यक्षा शालिनी सुखदान यांचे पती संजय लक्ष्मण सुखदान यांनी थेट गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फराटे यांनी बेकायदा कामे करण्यास नकार दिल्याने हा जीवघेणा हल्ला केला. गोळीबार करताना कट्ट्याचा ट्रिगर अडकल्याने फराटे यांचे प्राण बचावले. फराटे यांनी या घटनेच्या तब्बल सहा दिवसांनंतर तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ एप्रिल रोजी सायंकाळी पंचायत कार्यालयातील बैठकीदरम्यान सुखदान याने फराटे यांना दमदाटी केली. त्यानंतर पावणेआठच्या सुमारास फराटे चारचाकीने अहिल्यानगरकडे निघाले असता सुखदानने ‘बुलेट’वरून पाठलाग करत खोलेश्वर गणपती चौकाजवळ त्यांची गाडी अडवून गावठी कट्टा काढून फराटे यांच्यावर गोळीबार केला. फराटे वाकल्याने बचावले. त्यानंतर सुखदानने दुसरा फायर करण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रिगर अडकल्याने फराटे यांनी गाडी वेगाने पळवून जीव वाचवला. ‘घटनेनंतर घाबरलो होतो, त्यामुळे उशिरा फिर्याद दिली’ “संजय सुखदान ही खुनशी व गुंड प्रवृत्तीची व्यक्ती आहे. त्याने थेट गोळीबार केल्याने मी प्रचंड घाबरलो होतो. त्यामुळे फिर्याद द्यायला उशीर झाला. सुखदान यांच्याकडून मला काय त्रास होता, याची सविस्तर माहिती मी पोलिसांना फिर्यादीत दिली आहे. याव्यतिरिक्त मला जे काही सांगायचे आहे, ते मी थेट न्यायालयातच सांगेन.” – निखिल फराटे, मुख्याधिकारी, नेवासे नगरपंचायत दिव्य मराठी इनसाइड स्टोरी – बेकायदा कामे व मतदार यादीत बदलासाठी सीओंना धमक्या मुख्याधिकारी फराटे हे सप्टेंबर २०२५ पासून नेवासे येथे कार्यरत आहेत. आरोपी संजय सुखदान हा पत्नीच्या पदाचा गैरवापर करून फराटे यांच्यावर बेकायदा कामांसाठी आणि प्रभाग क्र. २ च्या मतदार यादीत नियमबाह्य बदलासाठी दबाव टाकत होता. नकार दिल्याने तो खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची व जिवे मारण्याची धमकी देत असे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *