Headlines

अजिंठा घाटातील वळणावर ट्रॅव्हल्सची आयशरला धडक:2 तास वाहतूक ठप्प, ट्रॅव्हल्समधील 49 जण सुखरूप, वाहनांच्या 10 किमी रांगा




अजिंठा घाटात ओव्हरटेक करून वर येणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला धडक दिल्याची घटना रविवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. यात ट्रॅव्हल्समधील ४९ पर्यटक सुखरूप असून, कोणालाही गंभीर इजा झाली नाही. या अपघातामुळे घाटातील वाहतूक दोन तास ठप्प झाल्याने वाहनांच्या दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात पाचव्यांदा अजिंठा घाटात अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. लोखंडी आसारी घेऊन फर्दापूरच्या दिशेने जाणारा आयशर (एमएच २१ बीएच २७९७) घाटातून जात असताना, राजस्थानची एक ट्रॅव्हल्स घाटाच्या खालून ओव्हरटेक करत वेगाने वर येत होती. घाटातील दर्गाजवळ असलेल्या एका तीव्र वळणावर ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला एका बाजूने धडक दिली. धडक लागलेली दोन्ही वाहने मोठी असल्याने अपघातानंतर घाटातील रस्ता बंद पडला. यामुळे घाटाच्या दोन्ही बाजूंना १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माहिती मिळताच अजिंठा ठाण्याचे सपोनि पवन इंगळे, उपनिरीक्षक बाबासाहेब भवर, संतोष पाईकराव, संजय कोळी, जफर पठाण, जमील तडवी, पाटील यांच्यासह आठ होमगार्डनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व होमगार्डच्या पथकाने वाहतूक नियंत्रणाचे काम केले. खासगी ट्रॅव्हल्स राजस्थानची; शिर्डीकडे जाताना अपघात राजस्थानची ही खासगी बस ४९ पर्यटकांना घेऊन जळगावहून शिर्डीच्या दिशेने जात होती. घाटातील एका वळणावर बसचालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि बस थेट समोरून येणाऱ्या आयशरला भिडली. बस घाट चढत असल्याने तिचा वेग कमी होता, ज्यामुळे बसमधील सर्व ४९ प्रवासी सुरक्षित राहिले. या धडकेत ट्रॅव्हल्स, आयशरचे नुकसान झाले. ऑक्टोबर महिन्यामध्ये २४ तास वाहतूक ठप्प ३ ऑक्टोबरला घाटात तीन ट्रक बंद पडल्याने ७ तास, १० ऑक्टोबरला तीन वाहने बंद पडल्याने ३ तास, १२ ऑक्टोबरला ३ ट्रकची धडक झाल्याने ४ तास, १६ ऑक्टोबरला ट्रकची ट्रॉलीला धडक बसल्याने १० तास तर रविवारी ट्रॅव्हल्स आणि आयशरची धडक होऊन २ तास वाहतूक ठप्प झाली. महिनाभरात २४ तास वाहतूक ठप्प झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *