![]()
अमरावतीच्या विलासनगर परिसरात अभिजीत रवींद्र बोधनकर यांच्या घरी तपासणी करून ६५ संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरुवार, ५ नोव्हेंबरला जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाच्या पथकाने केली. डीडीआर कार्यालयाला मिळालेल्या तक्रारींच्या आधारे सकाळी ११.१० वाजता तपासणी सुरू झाली. ती दुपारी ३.३० वाजेपर्यंत चालली. बोधनकर हे रमाबाई नगर, विलासनगर, अमरावती येथील रहिवासी आहेत. हा परिसर गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. उपनिबंधक सहकारी संस्था, अमरावती यांनी तक्रारींच्या आधारे पथक तयार केले. सहकारी अधिकारी श्रेणी एक मनोज रोहनकर यांच्या नेतृत्वाखालील पथकात विजय अंबाडेकर, एस. आर. हांडे आणि भाग्येश पुसदेकर यांचा समावेश होता. पंच म्हणून अजिंक्य ठाकरे आणि उमेश काळे उपस्थित होते. तपासणीदरम्यान अडथळा येऊ नये म्हणून गाडगेनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी निलेश अंबुलकर आणि सुनैना कांबळे यांनी पथकाला मदत केली. सावकारीच्या संशयावरून जप्त केलेली ६५ कागदपत्रे सील करण्यात आली. तपासणीत २४ कोरे स्टॅम्पपेपर, स्थावर मालमत्तेचे खरेदीखत, कोरे व सही केलेले चेक, नोंदवह्या आणि इतर कागदपत्रे आढळली. जप्त कागदपत्रांची महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ मधील तरतुदींनुसार पडताळणी सुरू आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेतील अधिकारी राजेश भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पडताळणी केली जात आहे.
Source link
अमरावतीत सावकारीच्या संशयावरून 65 कागदपत्रे जप्त:विलासनगरमध्ये अभिजीत बोधनकर यांच्या घरी तपासणी; कागदपत्रांची पडताळणी सुरू