Headlines

अमरावती तालुक्यात पाणंद रस्त्यांची मोजणी सुरू:शेतकऱ्यांच्या वाहतूक समस्येवर तोडगा




अमरावती तालुक्याच्या ग्रामीण भागात वर्षानुवर्षे रखडलेल्या पाणंद रस्त्यांच्या समस्येवर आता महसूल विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. या रस्त्यांच्या मोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या महसूल अभियानादरम्यान या संदर्भात निर्देश दिले होते. त्यानुसार, एसडीओ अनिल भटकर आणि तहसीलदार विजय लोखंडे यांनी वेळापत्रक तयार करून ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची पाहणी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या पाणंद रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना विशेषतः पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. चिखल, पाण्याने भरलेले खड्डे आणि अरुंद मार्गांमुळे शेतमाल वाहतुकीत अडथळे येत होते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते आणि दैनंदिन कामकाजही विस्कळीत होत होते. महसूल विभागाने पुढाकार घेत संबंधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही प्राथमिक मोजणी सुरू केली आहे. रस्ते मोकळे आणि सुस्थितीत करण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या मोजणी प्रक्रियेदरम्यान नांदगावच्या महसूल तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोरेश्वर इंगळे यांच्यासह राजेश बोडखे, गोरव देशमुख, जगदीश राऊत, अभिजित राऊत, संतोष गुंडेकर, नंदू सुंदरकर, उमेश ठाकरे, तलाठी आदेश गजभिये, कोतवाल गजानन खंडारे, दिनकर सुंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते. पाणंद रस्ते तयार करताना काही ठिकाणी अतिक्रमणाचा अडसर येऊ शकतो. संबंधित यंत्रणेच्या प्राथमिक अंदाजानुसार, काही शेतरस्त्यांचा भाग अतिक्रमणाने व्यापला आहे. त्यामुळे येत्या काळात ही अतिक्रमणे काढून पाणंद रस्त्यांचा सीमाविस्तार केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *