Headlines

अमरावती बारावीचा निकाल 0.96 टक्क्यांनी घसरला:मुलींची आघाडी कायम, तिन्ही शाखांमध्ये अमरावतीची बाजी




अमरावती मंडळाचा बारावीचा निकाल यावर्षी ०.९६ टक्क्यांनी कमी लागला आहे. गेल्यावर्षी ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, तर यावर्षी ही संख्या घसरून ९०.९२ टक्क्यांवर थांबली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी १ लाख ४८ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ४७ हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले आणि १ लाख ३४ हजार ३५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षीच्या निकालातही मुलांच्या तुलनेत मुलींचे यश लक्षवेधी ठरले आहे. विविध महाविद्यालयांच्या दाव्यानुसार, विज्ञान शाखेत ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाच्या यशश्री संतोष राजा हिने ९७.३३ टक्के (५८४/६००) गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. कला शाखेतून यावर्षी प्रथमच येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची विद्यार्थिनी श्रीदा शैलेश जोग ही ९५.८३ टक्के गुण मिळवून प्रथम आल्याचा दावा केला जात आहे. वाणिज्य शाखेत श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या सिद्धांत राकेश बत्रा याने ९६.१७ टक्के गुण प्राप्त करून अव्वल स्थान मिळवले. यशश्री राजा हिने सांगितले की, तीन वर्षांपूर्वी पितृछत्र हरपल्यानंतर आई आणि मोठ्या बहिणीने तिला आई-वडिलांचे प्रेम दिले. नियमित अभ्यास आणि वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचा ध्यास हे तिच्या यशाचे कारण ठरले. तिला भविष्यात डेटा सायन्स-एआय क्षेत्रात अभियंता व्हायचे आहे. अभ्यासात सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे तिने म्हटले. सिद्धांत बत्रा याने सांगितले की, गुरुजन आणि पालकांच्या मार्गदर्शनामुळे त्याला यश मिळाले. तो परीक्षेपूर्वी दररोज ६ तास अभ्यास करत असे. त्याचे वडील व्यावसायिक असून आई गृहिणी आहे. दोघांनीही त्याच्या अभ्यासाकडे लक्ष दिले. त्याला भविष्यात सीए व्हायचे आहे. क्रिकेट हा त्याचा आवडता खेळ असून तो त्याकडेही पुरेसे लक्ष देतो. गेल्या पाच वर्षांतील निकालाची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे: २०२६: ९०.९२% २०२५: ९१.८८% २०२४: ९३.३७% २०२३: ९२.७५% २०२२: ९४.२२% (कोरोना काळानंतरचे हे पहिले वर्ष होते.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *