![]()
पाण्यात शाम्पू आणि वेगवेगळी रसायने टाकून कृत्रिमरीत्या दूध बनवून त्याची ब्रँडेड दुधाच्या नावाने विक्री करणाऱ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या प्रकरणात मंचर पोलिसांनी आतापर्यंत
.
तपासादरम्यान या गुन्ह्याचा मुख्य आरोपी संदीप लोढा याच्या संपर्कात आंबेगाव परिसरात मका ट्रेडिंगचा व्यवसाय करणारा सुशांत हिंगे आला. लोढाने त्याला एका सप्लायरची माहिती दिली. त्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये या दोघांनी मिळून दूध भेसळीचे मोठे रॅकेट उभे केले, जे राज्याच्या सात ते आठ जिल्ह्यांत पसरले. मात्र, एका आरोपीची दैनंदिन दूध संकलन क्षमता केवळ ६०० लिटर असताना ती अचानक ४ हजार लिटरवर गेल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि या रॅकेटचा पर्दाफाश झाला.
पुणे, सोलापूर, जालना, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, बीड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हे रॅकेट सक्रिय होते. आरोपी सुशांत हिंगे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जि. प. सदस्य व दूध उत्पादक संघाचे सदस्य विष्णू हिंगे यांचा पुतण्या आहे. या प्रकरणात एफडीएने पोलिसांच्या मदतीने पाच जिल्ह्यांत कारवाई करत १.४८ कोटींचा मुद्देमाल जप्त केला.
भेसळप्रकरणी मकोका लावा; शिंदे यांचे निर्देश
मुंबई | दूध आणि पनीरमध्ये भेसळ करून नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या जिवाशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर आता थेट ‘मकोका’अंतर्गत कारवाई होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावरील एका महत्त्वाच्या बैठकीत हे कडक निर्देश दिले. भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करून त्यांच्या पळवाटा बंद कराव्यात, तसेच न्यायालयात खटला भक्कमपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांची एक ‘विशेष टीम’ तातडीने नेमावी, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. अन्नातील भेसळीमुळे कर्करोगासारखे आजार वाढत असून, अशा नराधमांवर कोणतीही नरमाई न दाखवता कायमची जरब बसवा, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
भेसळीसाठी विशिष्ट केमिकल फॉर्म्युला
सुशांत हिंगेच्या ताब्यातून १३८५ किलो वजनाचा भेसळ साठा जप्त करण्यात आला. भेसळीसाठी एक विशिष्ट फॉर्म्युला वापरला जायचा. दुधातील एसएनएफ वाढवण्यासाठी स्किम्ड मिल्क पावडर, प्रोटीन वाढवण्यासाठी व्हे पावडर, फॅट वाढवण्यासाठी व्हेजिटेबल ऑइल (पामतेल) आणि हे सर्व मिश्रण एकत्र करण्यासाठी इम्युलिझिफायर व डिटर्जंटचा वापर केला जात असे. कमी खर्चात जास्त नफा मिळवण्यासाठी आरोपी हा जीवघेणा गेल्या अनेक दिवसांपासून प्रयोग करत होते. या प्रकरणाचा पुढील तपास एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे व पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे पथक करत आहे.
अशी करायचे दुधात भेसळ
स्किम्ड मिल्क पावडर, व्हे पावडर, पामतेल, इमल्सिफायर, डिटर्जंट, शाम्पू व इतर रासायनिक पदार्थांचा वापर करून कृत्रिम दूध तयार केले जात होते. १०० लिटर बनावट दूध तयार करण्यासाठी व्हे पावडर, चार लिटर पामतेल, रसायने व शाम्पू वापरला जात असे. त्यानंतर हे मिश्रण संकलन केंद्रावरील खऱ्या दुधात मिसळून ब्रँडेड पाकिटात भरण्यासाठी पाठवले जाई. यातून दरदिवशी मोठी कमाई केली जात असे. सुशांत हिंगेच्या घरी टाकलेल्या छाप्यात पोलिसांना डिटर्जंटचे लिक्विड, व्हे पावडर आणि इम्युलिझरचे साठे सापडले.