Headlines

अमरावती विभागात बुलडाणा अव्वल:अमरावती जिल्हा 88.26 टक्के निकालासह पिछाडीवर




आज घोषित झालेल्या बारावीच्या निकालात अमरावती विभागातून बुलडाणा जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. या जिल्ह्यात ९५.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर अमरावती जिल्हा ८८.२६ टक्के निकालासह सर्वात कमी टक्केवारी नोंदवत शेवटच्या स्थानावर राहिला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय बोर्डाचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. मंडळाच्या प्रभारी सचिव तथा शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी ही माहिती दिली. वाशिम जिल्ह्यात ९१.१५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तो विभागात दुसऱ्या स्थानावर आहे, तर अकोला जिल्हा ९०.१४ टक्के निकालासह तिसऱ्या स्थानावर आहे. यवतमाळ जिल्हा ८९.६९ टक्के निकालासह चौथ्या स्थानावर राहिला. अमरावती विभागाचा गतवर्षीचा निकाल ९१.८८ टक्के होता. यावर्षी टक्केवारी घसरली असली तरी, राज्यात अमरावती विभागाने कोकण (९४.१४ टक्के) आणि पुणे (९१.२५ टक्के) विभागांनंतर तिसरे स्थान प्राप्त केले आहे. उत्तीर्णतेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत अधिक आहे. अमरावती विभागातील ९३.९५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.२९ टक्के आहे. परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना आगामी आठवडाभरात गुणपत्रिकांच्या मूळ प्रती संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातून प्राप्त होणार आहेत. पत्रकार परिषदेला मंडळाच्या सहसचिव संगीता साळुंके-पवार व अधीक्षक पौर्णिमा कन्नमवार उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गुण पडताळणीसाठीचे अर्ज ३ मे पासून ऑनलाईन स्वीकारले जातील, ज्याची अंतिम तारीख १७ मे आहे. प्रतिविषय शुल्क ५० रुपये असेल. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती हव्या आहेत, त्यांनाही १७ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी प्रतिविषय ४०० रुपये शुल्क आकारले जाईल. उत्तरपत्रिकेची छायाप्रत प्राप्त झाल्यानंतर त्या विषयाचे पुनर्मूल्यांकन करावेसे वाटल्यास, छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत ऑनलाईन अर्ज करता येईल. यासाठी प्रतिविषय ३०० रुपये शुल्क आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *