![]()
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी पुण्यातील ‘अमिगो ॲकॅडमी’वर विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. विमान कर्मचारी, आतिथ्य व्यवस्थापन आणि पर्यटन क्षेत्रातील प्रशिक्षणाच्या नावाखाली ही फसवणूक झाल्याचे त्यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. माने यांनी राज्य सरकारने या संस्थेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुनील माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिगो ॲकॅडमीने विद्यार्थ्यांकडून ८० हजार ते १ लाख ९५ हजार रुपयांपर्यंत शुल्क वसूल केले आहे. पुण्यातील २७ विद्यार्थ्यांनी या प्रकरणी तक्रार केली असून, त्यांची एकूण फसवणूक ३७ लाख ९६ हजार ५०० रुपयांची आहे. २०२२ पासून संस्थेच्या पुणे शाखेत सुमारे १७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. अभ्यासक्रम पूर्ण होऊनही संस्थेने विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली नाही किंवा त्यांना अधिकृत प्रमाणपत्रे दिली नाहीत, असा आरोप आहे. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना ३० ते ३५ हजार रुपये पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात फार कमी विद्यार्थ्यांना १० ते १५ हजार रुपयांच्या नोकऱ्या मिळाल्या, तर काही जणांना विमानतळावरील कॅन्टीनमध्ये वेटर म्हणून काम करावे लागले. संस्थेकडून “शासनाकडून परीक्षा घेतली नाही” असे खोटे उत्तर दिले जात होते. परंतु, माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, संस्थेने परीक्षेसाठी आवश्यक असलेली प्रक्रियाच पूर्ण केली नसल्याचे उघड झाले आहे. माने यांनी अमिगो ॲकॅडमीच्या मुंबईतील घाटकोपर, बोरिवली, बांद्रा, अंधेरी आणि ठाणे येथील शाखांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. अनेक पालकांनी मुलांच्या भविष्यासाठी कर्ज काढून पैसे भरले होते, मात्र आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष आणि पैसे दोन्ही वाया गेल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार करण्यात येत असून, राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुनील माने यांनी केली आहे.
Source link
अमिगो ॲकॅडमीकडून विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक:राज्य सरकारने कारवाई करावी; सुनील माने यांची मागणी