![]()
देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आगामी पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सुरक्षा व्यवस्था तसेच आवश्यक नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली गुरवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांतील रस्ते स्वच्छता, नालेसफाई, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांवरील खड्डे, अनधिकृत होर्डिंग्ज तसेच अतिक्रमणे याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. दौऱ्याच्या मार्गावरील तसेच संबंधित परिसरातील स्वच्छता व नागरी सुविधांची कामे तातडीने पूर्ण करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मा.महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे, नाले व ड्रेनेजची प्रभावीपणे सफाई करणे, अनधिकृत होर्डिंग्ज हटविणे तसेच अतिक्रमणांवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता, वाहतूक सुरळीतता, रस्त्यांची स्थिती आणि आवश्यक नागरी सुविधा याबाबत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले. या बैठकीस सभागृह नेते गणेश बिडकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (जनरल ) पवनीत कौर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (विशेष.) ओमप्रकाश दिवटे तसेच पुणे महानगरपालिकेचे विविध विभागांचे उपायुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने दिल्ली मधील विद्यार्थी आंदोलनावर लाठीमार केल्याच्या निषेधार्थ अमित शाह यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे आणि सेवन लव्ह चौक येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर भाजपने काँग्रेसच्या आंदोलनास जशास तसे उत्तर दिले जाईल असे सांगितले आहे.
Source link
अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी आढावा बैठक:महापालिका प्रशासनाकडून सुरक्षा व सुविधांचा आढावा घेण्यात आला