![]()
परतवाडा येथील अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपीवर तात्काळ कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी केली आहे. सेनेच्या एका प्रतिनिधीमंडळाने अमरावती येथे जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. शिवसेनेच्या मते, ही घटना अत्यंत धक्कादायक, गंभीर आणि निंदनीय आहे. या घटनेतील मुख्य आरोपी मो. अयाज मो. अहमद याने काही मुलींचे लैंगिक शोषण केले. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत आहे. सदर घटनेतील आरोपींवर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांना कठोरात कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी अरबट यांनी केली. अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणात आदर्श उदाहरण निर्माण करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी महिला जिल्हाप्रमुख अरुणा इंगोले, उपजिल्हाप्रमुख सुनील केने, महानगर प्रमुख रश्मी तायडे, तसेच सुधीर खंडार, गजानन कात्रे, यश बनसोड, मंगेश ढोके, गणेश भुजाडे, संजय देशमुख, शहर प्रमुख वृंदा मुक्तेवार, अस्मिता बोडे, अर्चना कांबळे, ज्योती राईकवार, सागर गेठे, राहुल भुंबर, गणेश गावंडे, विनय गावंडे आणि इतर महिला शिवसैनिक उपस्थित होते. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी झाली असून, अनेक संस्था, संघटना आणि लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची निंदा केली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. एक दिवसापूर्वीच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या घटनेची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरण समजून घेतले आणि योग्य ते निर्देश दिले.
Source link
अल्पवयीन मुलींच्या गैरवर्तनाप्रकरणी आरोपीवर तात्काळ कारवाईची मागणी:शिवसेना माजी जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी पोलिस अधीक्षकांना दिले निवेदन