![]()
नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी या प्रकरणासंदर्भात अत्यंत स्फोटक दावे केले आहेत. “हे प्रकरण आज घरोघरी पोहोचले कारण याचे धागेदोरे थेट सत्ताधाऱ्यांशी जोडलेले आहेत. हा बाबा जर एकनाथ शिंदे यांचा नसता आणि रूपाली चाकणकर यांची त्याच्यावर भक्ती नसती, तर कदाचित पोलिसांनी हे प्रकरण दाबले असते,” असा खळबळजनक दावा श्याम मानव यांनी केला आहे. प्रा. श्याम मानव यांनी या प्रकरणाच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठीच या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना मिळाले आहेत. खरातचे आयपीएस महिला अधिकारी आणि अनेक बडे अधिकारी शिष्य आहेत. राजकीय वरदहस्त आणि प्रशासकीय पाठबळामुळेच या भोंदूचे प्रस्थ वाढले होते.” बनावट ‘आयटी’ रेड आणि खंडणीचे रॅकेट अशोक खरातच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकताना श्याम मानव यांनी सांगितले की, हा भोंदू बाबा अत्यंत चलाखीने लोकांच्या काळ्या कमाईची माहिती काढायचा. त्यानंतर स्वतःचे बनावट ‘इन्कम टॅक्स ऑफिसर’ तयार करून तो संबंधित व्यक्तीवर धाडी टाकायचा आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळायचा. विशेष म्हणजे, या संपूर्ण गैरप्रकारात आतापर्यंत कोणाही पोलीस अधिकारी किंवा राजकीय नेत्याने हस्तक्षेप केला नाही, ही चिंतेची बाब आहे. महिला स्वतःला बाबांना अर्पण करतात, ही देशाची शोकांतिका देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना श्याम मानव यांनी तीव्र खंत व्यक्त केली. “खरात सोबतच्या महिलांचे व्हिडिओ कदाचित बघितले असतील. कोणत्याही महिलांचे कपडे त्या बाबाने काढले नाही. जे बाबा महिलांना भीती दाखवतात ते मूर्ख आहेत. कारण, बाबाला काहीही करायची गरज नाही, फक्त जाहीर करायचं ‘मी गुरु आहे तुमचा’, बसं सगळं संपलं. सर्व आयतं उपलब्ध होत, नंबर लागत नसल्याची परिस्थिती राहते. आज देशात इतकी भयावह परिस्थिती आहे. आज एखाद्या महिलेची छेड काढली तर हाणामारीचे प्रसंग येतात. आणि याचं देशात हजारोच्या संख्येने महिला स्वतःला बाबाला अर्पण करत आहे. हजारो वर्षांपासून या देशात हे बिंदासपणे सुरु आहे, नव्हे तो आपल्या कल्चरचा भाग मानला जातोय,” असेही श्याम मानव यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्र्यांचे ‘आभार’ मानण्यामागचा टोला हा बाबा एकनाथ शिंदे यांचा बाबा नसता, आणि अजित पवारांच्या गटातील रूपाली चाकणकर यांची भक्त नसती तर कधीच हा बाबा उघड झाला नसता. कदाचित पहिलेच प्रकरण पोलिसांनी त्यांच्या पातळीवर दाबवून टाकावे, अशा सूचना मिळाल्या असत्या. पण, एकनाथ शिंदें आणि राष्ट्रवादीला धडा शिकवायचा आहे, म्हणून उत्तम प्रकारे प्रकरण हाताळण्याच्या सूचना पोलिसांना मिळाल्या. एकनाथ शिंदे, रूपाली चाकणकर यांच्यासारख्या मित्र पक्षातल्या नेत्यांचा संबंध खरातशी समोर आल्यामुळे या प्रकरणाचा तपास करू देत आहेत. अशोक खरात या भोंदू बाबाचे प्रकरण उघड झाल्याबद्दलं ‘एकनाथ शिंदे’ यांचे आभार मानले पाहिजे. म्हणूनचं खरात प्रकरणाचा सर्वार्थाने तपास होतोय, असा टोलाही त्यांनी लगावला.
Source link
अशोक खरात प्रकरण उघड झाल्याबद्दल शिंदेंचे आभार मानले पाहिजे:तपास का होतोय? प्रा. श्याम मानव यांनी मांडले धक्कादायक तर्क