Headlines

आठव्या राष्ट्रीय पोषण पंधरवडा जनजागृती उपक्रमाची प्रभावी अमंलबजावणी:पुणे जिल्हा देशात द्वितीय क्रमांकावर, सीईओ गजानन पाटील यांची माहिती




पुणे जिल्ह्याने आठव्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्याच्या जनजागृती उपक्रमात देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, ९ एप्रिल २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये हे उपक्रम राबवले जात आहेत. या पंधरवड्यात आतापर्यंत २ लाख ८८ हजार ४३४ उपक्रम घेण्यात आले आहेत. या कामगिरीमुळे जिल्ह्याने देशात द्वितीय स्थान मिळवले आहे. अहमदनगर जिल्हा प्रथम स्थानी असून, बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या पंधरवड्याचे राष्ट्रीय स्तरावरील उद्घाटन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णादेवी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले होते. जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यंदाचा पंधरवडा ‘बालकांच्या जीवनातील पहिल्या ६ वर्षांतील मेंदूचा विकास’ या मुख्य संकल्पनेवर आधारित आहे. यामध्ये माता व बालकांचे पोषण, शून्य ते तीन वर्ष वयोगटातील बालकांच्या मेंदूच्या विकासासाठी पूर्व उद्दीपन, तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी खेळ आधारित पूर्व शालेय शिक्षण, बालकांचा स्क्रीनवरील वेळ कमी करण्यासाठी पालकांची भूमिका आणि अंगणवाडी केंद्रे सक्षम करण्यासाठी समुदायाचा सहभाग वाढवणे या प्रमुख विषयांवर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने गाव पातळीवर आरोग्य, शालेय शिक्षण, ग्रामविकास आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयाने हे अभियान राबवले जात आहे. ग्रामपंचायत व अंगणवाडी स्तरावर मशाल फेरी, पाककृती स्पर्धा, पोषण रॅली, माता बालक आरोग्य मार्गदर्शन शिबिरे, आहार प्रात्यक्षिके, गृहभेटी तसेच पालक बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांमध्ये महिला, पालक व स्थानिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी केले. अंगणवाडी स्तरावरील उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील तसेच महिला व बाल कल्याण सभापती अंकिता पाटील यांनी सर्व यंत्रणांचे कौतुक केले, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी आनंद खंडागळे यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *