Headlines

आदिवासी संस्कृती जपण्यासाठी शासन कटिबद्ध:घोडेगावच्या रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवाचे सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन




आदिवासी संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले. घोडेगाव येथे रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवाचे उद्घाटन त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिनाचे औचित्य साधून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगावने या महोत्सवाचे आयोजन केले होते. उद्घाटनावेळी आमदार शरद सोनवणे, बाबाजी काळे, खेड पंचायत समितीच्या सभापती गौरी मुऱ्हे आणि प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते उपस्थित होते. भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्ता, सावकारी आणि जमीनदारी व्यवस्थेविरोधात लढा दिला. आदिवासी समाजाचे हक्क, जमीन आणि स्वाभिमानासाठी त्यांनी ‘उलगुलान’ घडवले. अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी उभा केलेला संघर्ष आजही प्रेरणादायी आहे. त्यांचा त्याग आणि स्वाभिमानाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे पवार म्हणाल्या. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यात भिल्ल, महादेव कोळी आणि गोंड समाजातील क्रांतिकारकांचे योगदान मोठे आहे, असे त्यांनी सांगितले. राघोजी भांगरे, रामजी भांगरे आणि वीर बाबुराव शेडमाके यांनी अन्यायाविरोधात दिलेली झुंज महाराष्ट्राच्या इतिहासाचा भाग आहे. आदिवासींची लोककला, लोकसंगीत, हस्तकला आणि वेशभूषा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. आदिवासी समाजाचे जल, जमीन आणि जंगलाशी असलेले नाते पर्यावरण संवर्धनाचा संदेश देते. पारंपरिक रानभाज्या आणि खाद्यपदार्थ आरोग्य व पौष्टिकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. अशा महोत्सवांमुळे खाद्यसंस्कृती जपली जाईल आणि स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ मिळेल, असे पवार यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. पारधी समाजासह सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *