![]()
पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात. पूरग्रस्त, संपर्क तुटणाऱ्या गावांत तसेच आदिवासी क्षेत्रातील दुर्गम भागांत तत्काळ मदत पोहोचेल. यादृष्टीने प्रभावी नियोजन करावे. यासाठी सर्व स्तरांवरील संपर्क यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि बचाव पथके २४ तास कार्यान्वित ठेवून जिल्हा प्रशासनाने नेहमी सतर्क राहावे. असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी दिले. आपत्तीच्या वेळी नागरिकांना मदत मिळण्यासाठी नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक सर्व माध्यमांद्वारे जाहीर करावेत. असेही त्यांनी सांगितले.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्तांनी अमरावती विभागातील मान्सून पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला अपर आयुक्त संजय जाधव, कृषी सहसंचालक गणेश घोरपडे प्रत्यक्षरित्या उपस्थित होते. विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांचे प्रमुख व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.पावसाळ्यात पूरबाधित किंवा संपर्क तुटणाऱ्या गावांतील नागरिकांसाठी उंच ठिकाणी निवारा व्यवस्था करावी. भोजन व्यवस्था करावी. धान्य आणि औषधींचा साठा आधीच करून ठेवावा. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नयेत. यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासावी. सर्पदंश व विंचूदंशावरील पुरेशी औषधे व इंजेक्शन्स प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध ठेवावीत. दुर्गम भागातील गरोदर मातांची काळजी घेण्यासाठी आरोग्य केंद्रांनी उपाययोजना कराव्यात. एसडीआरएफ, एनडीआरएफची बचाव पथके स्थापन करावीत. अवकाळी पाऊस किंवा वादळानंतर वीजपुरवठा खंडित झाल्यास तो सुरळीत करण्यासाठी महावितरणने नियोजन करावे. धरणांमधून पाणी सोडताना संबंधित तहसीलदार, पोलिस आणि नियंत्रण कक्षाला २४ तास आधी कळवणे बंधनकारक राहील. नदीकाठावरील धोकादायक गावांमध्ये (ब्लू लाईन, रेड लाईन) सीमांकन करून पूर प्रतिबंधक समित्या स्थापन कराव्यात. दुर्गम भागात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करावी दुर्गम व संपर्कहीन भागात आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘बिनतारी संदेश यंत्रणा’ (वायरलेस सिस्टीम) कार्यान्वित करावी. हवामान खात्याकडून मिळणारे इशारे नागरिकांपर्यंत जलद गतीने पोहोचवावेत. तसेच वीज पडण्याचे संकेत देणाऱ्या ”दामिनी ॲप”चा वापर वाढवण्याबाबत जनजागृती करावी. शेवटी, विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी, संभाव्य पूरबाधित गावे, हवामान अंदाज केंद्रे, औषध साठा, खरीप हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला. विभागांना आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याचे आदेश दिले.
Source link
आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे:विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे निर्देश