![]()
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सध्या राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक पवित्रा घेत सर्वोच्च न्यायालयावर धडक मोर्चा काढला होता. याच संपूर्ण राजकीय घडामोडींवर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर ‘सीजेपी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनीही ताशेरे ओढले आहेत. “सर्वोच्च न्यायालय नरेंद्र मोदींना ही निवडणूक न लढवता पुढची निवडणूक लढवण्याचा सल्ला देऊ शकते का?” असा सवाल विचारत दिपके यांनी न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुढची रणनीती दिल्लीतच ठरणार; पोलिसांना 24 तासांचा अल्टिमेटम मागील काही दिवसांपासून दिल्ली पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर माहिती देताना दिपके म्हणाले की, “सीजेपीचे प्रमुख नेते आशुतोष आणि सौरभ हे दिल्ली पोलिसांची भेट घेण्यासाठी गेले होते, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आम्ही दिल्ली पोलिसांना २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. आमच्या आंदोलनाची पुढची रणनीती आता आशुतोष आणि सौरभ दिल्लीतच जाहीर करतील, आणि सध्या आमची संपूर्ण टीम त्यावर काम करत आहे.” सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगावर थेट निशाणा इंडिया आघाडीने काढलेल्या भव्य मोर्चाची दखल घेत दिपके यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. इंडिया आघाडीच्या नेत्यांना सरन्यायाधीशांनी (CJI) वेळ न दिल्याने केरळ काँग्रेसने सोशल मीडियावर सीजेआय यांना हटवण्याबाबतची पोस्ट केली, जी नंतर डिलीट करण्यात आली. यावरून सरन्यायाधीशांचा अपमान झाला आहे का? असा प्रश्न विचारला असता, दिपके यांनी थेट भाष्य करणे टाळले, मात्र त्यांनी न्यायालयाच्या भूमिकेवर टीका केली. “कायदा आणि सुव्यवस्था ही आमची जबाबदारी नाही, असे सर्वोच्च न्यायालयानेच काही दिवसांपूर्वी म्हटले होते. मग निवडणूक आयोगावर त्यांनी कोणती कारवाई केली? कोणतीही नाही,” असा घणाघात त्यांनी केला. ‘मतदारांना एक न्याय आणि मोदींना दुसरा न्याय कसा?’ बंगालमधील निवडणुकांचा संदर्भ देत दिपके यांनी सवाल उपस्थित केला. “बंगालमध्ये जेव्हा मतदारांची नावे यादीतून गायब झाली, तेव्हा ‘आता मतदान करता आलं नाही, तर पुढच्या वेळी करा’ अशी भूमिका न्यायालयाने घेतली होती. जर न्यायालय मतदारांना असे सांगत असेल, तर तेच सर्वोच्च न्यायालय पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘तुम्ही यावेळेस निवडणूक लढवू नका, पुढच्या वेळी लढा’ असे सांगू शकेल का? जर तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना असे सांगू शकत नाही, तर सामान्य मतदारांना तुम्ही असा न्याय कसा काय देऊ शकता?” असा थेट प्रश्न त्यांनी विचारला आहे. इंडिया आघाडीच्या आंदोलनाचे केले स्वागत देशातील लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीने काढलेल्या मोर्चाचे अभिजीत दिपके यांनी स्वागत केले. “काल इंडिया आघाडीने दिल्लीत केलेले शक्तिप्रदर्शन आणि विरोध प्रदर्शन हे अत्यंत मोठे आणि काळाची गरज असणारे होते. मी या आंदोलनासाठी इंडिया आघाडीला खूप खूप शुभेच्छा देतो,” असे म्हणत त्यांनी या लढ्यात विरोधी पक्षांच्या भूमिकेला आपला भक्कम पाठिंबा दर्शवला आहे. —————– हेही वाचा.. CJP नेते आशुतोष, सौरव पोलिसांच्या ताब्यात:जंतर-मंतरवर तिरंगा फडकवत होते; केंद्राने येथे निदर्शने करण्यावर घातली बंदी कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांनीही आज CJP समर्थकांसह जंतर-मंतरवर जात घोषणाबाजी केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. जंतर-मंतरवर आता आंदोलने करता येणार नाहीत. कारण, केंद्र सरकारने सोमवारी त्याला निर्धारित आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळले आहे. सविस्तर वाचा
Source link
इंडिया आघाडीच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा:निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेवरही उपस्थित केले प्रश्न