“देशातील जनतेने सत्ताधाऱ्यांना मनातून पूर्णपणे उतरवले असून या सरकारला सत्तेवरून हाकलून देण्यासाठी लोक एका एका क्षणाची वाट पाहत आहेत. विरोधकांच्या आंदोलनांना बदनाम करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी राहुल गांधी हे जनतेचे खरे नेते असल्याचे सिद्ध झाले आहे
.
पत्रकार परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधींच्या आंदोलनावरील सत्ताधाऱ्यांचे आरोप, गोंदियातील तिरोडा तालुक्यातील फुटलेला तलाव, राज्यातील भीषण दुष्काळ आणि दुष्काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सरकारने व्हीआयपींसाठी केलेल्या 13 कोटींच्या आलिशान गाड्यांच्या खरेदीवरून महायुती सरकारवर तीव्र टीका केली.
आंदोलने बदनाम करण्याचा डाव; राहुल गांधी हेच जनतेचे नेते!
आंदोलनातील छायाचित्रांवरून सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या आरोपांचा समाचार घेताना वडेट्टीवार म्हणाले, “एखाद्या फोटोमध्ये काय आहे, ते मुद्दाम केले की सहज झाले, यावरून वाद उकरून केवळ मूळ आंदोलनाला बदनाम करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. संसदेत खासदारांच्या संख्येत हे लोक मोठे दिसत असले, तरी जनतेच्या मनात मात्र पूर्णपणे संपले आहेत. त्यामुळे त्यांच्या या बकवास बोलण्याकडे देश लक्ष देणार नाही.”
हिटलरशाहीचे भूत उतरवणार
“राहुल गांधींच्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे की, देशातील लोकशाही, संविधान आणि जनतेच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठीच हा संघर्ष सुरू आहे. मोदींच्या डोक्यात शिरलेली हिटलरशाही उतरवण्यासाठीच हा शिवतांडव सुरू असून जनता राहुल गांधींच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.”

कुंभमेळा आणि कंत्राटांसाठी 25 टक्के कमिशन; पण तलाव दुरुस्तीसाठी पैसे नाहीत!
गोंदिया जिल्ह्यातील भीषण दुर्घटनेवर बोट ठेवत त्यांनी जलसंधारण विभागाच्या भ्रष्टाचारावर ताशेरे ओढले. “गोंदिया जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तिरोडा तालुक्यात दोन वर्षांपासून एका तलावाच्या पाळीला मोठ्या भेगा पडल्या होत्या. ग्रामस्थ सातत्याने प्रशासनाकडे तक्रारी करत होते. मात्र, दुर्लक्ष झाल्यामुळे अतिवृष्टी नसतानाही तलाव फुटला आणि दुष्काळात साचलेले होते नव्हते ते पाणीही वाहून गेले.”
कमिशनखोरीचे राजकारण
“तलावाच्या किरकोळ दुरुस्तीसाठी लागणारा निधी सरकारकडे नाही; मात्र कुंभमेळा, शक्तिपीठ महामार्ग आणि कोट्यवधींच्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांचे टेंडर्स मॅनेज करून 20 ते 25 टक्के कमिशन खाण्यासाठी सरकारकडे भरपूर पैसा आहे. तलावांचे पाणी वाहून गेल्यानंतर आता शेतकरी पाण्यावाचून तडफडत आहेत, याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, अन् मंत्र्यांच्या दिमतीला 13 कोटींच्या गाड्या!
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि सरकारच्या बडेजावपणावर बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “संपूर्ण महाराष्ट्र आज दुष्काळाने होरपळत आहे. अशा गंभीर परिस्थितीत शेतकरी आणि जनतेला मदत देण्याऐवजी राज्य सरकारने व्हीआयपी पाहुण्यांच्या दिमतीसाठी तब्बल 13 कोटी रुपयांच्या आलिशान गाड्या खरेदी करण्यास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. दुष्काळात जनतेचा पैसा अशा प्रकारे उधळणे ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी विकृती आहे.”
पुढचे 8-10 महिने कसे काढायचे?: “शेतकऱ्यांसमोर जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी, कर्जाचे हफ्ते आणि मुलांचे शिक्षण असे गंभीर प्रश्न उभे ठाकले आहेत. मी नुकताच दौऱ्यावर असताना पाहिले की, शेतकरी कुटुंबांकडे कॉलेजची 40 हजार रुपये फी भरायला पैसे नसल्याने इंजिनिअरिंग, डॉक्टर आणि एमएससीच्या पदवीधर मुलांना शिक्षण सोडून घरी बसवावे लागले आहे. या तरुण पिढीच्या उद्ध्वस्त होणाऱ्या भविष्याची सरकारला कसलीच चिंता नाही.”
गाड्या खरेदी बंद करा, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रोख मदत जमा करा!
शासनाला जाब विचारताना विजय वडेट्टीवार यांनी ठाम मागण्या मांडल्या. “या सरकारला शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची किंवा सर्वसामान्य कुटुंबांची काडीचीही काळजी नाही. हे सरकार केवळ स्वतःच्या सेवेसाठी आणि बडेजावपणासाठीच सत्तेत बसले आहे.”
थेट रोख मदतीची मागणी
“गाड्यांच्या खरेदीचे सोंग आणि शक्तिपीठासारखे अनावश्यक खर्च सरकारने तात्काळ थांबवावेत. दुष्काळात होरपळणाऱ्या राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट आर्थिक मदत दिवाळीपूर्वी थेट त्यांच्या बँक खात्यात नगदी स्वरूपात जमा करावी,” अशी जोरदार मागणी विजय वडेट्टीवार यांनी शेवटी केली.
——————————————————–
हेही वाचा….
रोहित पवार म्हणजे महाराष्ट्राचे नवे पप्पू!: व्हिडिओ दाखवत विक्रम पाचपुतेंची सडकून टीका, म्हणाले- आंदोलनस्थळी राष्ट्रध्वज अन् संविधान सोडून गेले

“पुण्यात एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या 12 दिवसांच्या आंदोलनानंतर अखेर तोडगा निघाला, यात मध्यस्थी करणारे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि चौथ्यांदा संवेदनशीलतेने वेळ देणारे मुख्यमंत्री यांचे आभार. मात्र, हे आंदोलन संपल्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि विविध पक्षांतील नेत्यांना एकच प्रश्न भेडसावतोय—हे आंदोलन नक्की कशासाठी होते आणि यातून साध्य काय झाले? 30 सप्टेंबरलाच मुख्यमंत्री महोदयांनी न्यायालयीन चौकशी मान्य केली होती, मग हा 12 दिवसांचा संघर्ष कोणासाठी ताणला? केवळ स्वतःच्या राजकीय लाँचिंगसाठी आणि गांधी परिवाराला खूश करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भावनांचा गैरवापर करणारे रोहित पवार म्हणजे महाराष्ट्राचे नवे ‘पप्पू’ आहेत,” अशी जहरी टीका भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी