![]()
देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कुठल्यातरी पक्षाने सुप्रीम कोर्टाच्या विरोधात मोर्चा काढला. लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असलेल्या न्यायपालिकेवर अशा पद्धतीची झुंडशाही आजपर्यंत एकाही राजकीय पक्षाने केली नव्हती,” असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. ‘काँग्रेसचा इतिहासच संविधान पायदळी तुडवण्याचा’ नवनाथ बन यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चावर टीका करताना म्हटले की, हा मोर्चा केवळ सुप्रीम कोर्टावर नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानावरचा हल्ला होता. “संविधान पायदळी तुडवण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून हेच केलं होतं आणि आता राहुल गांधी तेच करत आहेत,” असे बन म्हणाले. कालच्या मोर्चादरम्यान एका महिला पत्रकाराला धक्काबुक्की झाल्याचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसच्या लोकशाहीवरील विश्वासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कार्यकर्ते आणि मुख्यमंत्र्यांना धक्काबुक्की: ‘हाच का तुमचा न्याय?’ बन यांनी राहुल गांधींच्या वागणुकीवरही गंभीर आरोप केले. “राहुल गांधींनी कालच्या मोर्चात आपल्याच कार्यकर्त्यांना आणि अगदी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. शिवकुमार यांनाही धक्काबुक्की केली. सत्ता नसताना यांची एवढी दादागिरी आहे, तर उद्या सत्ता आल्यावर हे कार्यकर्त्यांची काय अवस्था करतील?” असा सवाल त्यांनी विचारला. काँग्रेसमध्ये केवळ गांधी घराण्यालाच महत्त्व दिले जाते आणि इतर कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते, त्यामुळे जनता यांच्या पाठीशी कशी राहील, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांच्यावर पलटवार; ‘आंदोलनांवर बंदी घालण्याचा इतिहास काँग्रेसचाच’ संजय राऊत यांनी ‘जंतरमंतरवर बंदी का घातली?’ असा सवाल केल्यावर नवनाथ बन यांनी त्यांना सविस्तर उत्तर दिले. “संजय राऊत सध्या राहुल गांधींचे प्रवक्ते झाले आहेत. जंतरमंतरवर कुठेही बंदी नाही, पण ते शहर मध्यवर्ती असल्याने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आणि गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार आंदोलनांसाठी पर्यायी जागा (रामलीला मैदान, बुराडी मैदान, शहादरा मैदान) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले. बन म्हणाले, “१९७२ पूर्वी लाल किल्ल्यावर आंदोलनं व्हायची, पण इंदिरा गांधींनी त्यावर बंदी घातली. १९८८ पर्यंत बोट क्लबवर आंदोलनं होत असत, पण महेंद्रसिंह टिकैत यांच्या शेतकरी आंदोलनानंतर राजीव गांधींनी तिथेही बंदी घातली. त्यामुळे आंदोलनांवर बंदी घालण्याचा इतिहास काँग्रेसचाच आहे, भाजपचा नाही.” ‘देशाला झुंडशाही करणाऱ्या नेत्यांची गरज नाही’ सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढण्याच्या आणि सरन्यायाधीशांची वेळ मागून झुंडशाही करण्याच्या राहुल गांधींच्या कृतीचा बन यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. “देशाला विरोधी पक्षनेत्याची नक्कीच गरज आहे, पण अशा पद्धतीने झुंडशाही करणाऱ्या नेत्याची नाही. लोकशाहीत आंदोलनाची एक पद्धत असते, पण न्यायपालिकेविरोधात अशा प्रकारचा मोर्चा काढणे लोकशाहीला घातक आहे,” असे बन म्हणाले. ———— हेही वाचा.. लोकशाहीत आंदोलनावर बंदी घालता येणार नाही:अन्यथा पंतप्रधान मोदींना राजीनामा द्यावा लागेल- खासदार संजय राऊत
देशात हुकूमशहांकडून आंदोलनावर बंदी आणण्यात आली आहे का? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. लोकशाहीप्रधान देशात अशा प्रकारे आंदोलनावर बंदी घालता येणार नाही. जर अशी जबरदस्ती केली गेली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. सविस्तर वाचा
Source link
सत्ता नसताना काँग्रेसची एवढी दादागिरी असेल, तर उद्या काय होईल?:सुप्रीम कोर्टावरील मोर्चावरून भाजपचा राहुल गांधी आणि संजय राऊतांवर घणाघात