![]()
“काँग्रेसने दलित, आदिवासी, ओबीसी आणि बौद्ध समाजाला सत्तेत वाटेकरी न समजता केवळ व्होट बँक म्हणून वापरले, हे ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे 100 टक्के खरे आहे. याच कारणामुळे 2011 मध्ये मी काँग्रेसची साथ सोडली होती. काँग्रेस आणि तथाकथित पुरोगामी आघाडीच्या आमंत्रणाची वाट पाहत बसण्यापेक्षा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व रिपब्लिकन शक्तींनी एकत्र यावे. आपण तुकड्यांमध्ये विभागलेले आहोत म्हणूनच आपल्याला दुर्लक्षित केले जाते; जर आपण एकत्र आलो, तर आपल्याला सत्तेपासून आणि मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याची हिंमत कोणातही होणार नाही,” अशी भावनिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची साद केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना घातली आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीतून दलित, आदिवासी, ओबीसी आणि बौद्ध नेतृत्वाला जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप करत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर ‘जातीवादी’ असल्याची घणाघाती टीका केली होती. आंबेडकरांच्या याच भूमिकेचे जोरदार समर्थन करत रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत शायरीच्या माध्यमातून देशात आणि महाराष्ट्रात ‘रिपब्लिकन ऐक्या’चा नवा सूर आळवला आहे. बंटे रहे तो इस्तेमाल, एक हुए तो कमाल!; आठवलेंचा आंबेडकरांना प्रस्ताव सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांना उद्देशून लिहिलेल्या आवाहनात आठवले म्हणाले, “आदरणीय प्रकाश आंबेडकर (बाळासाहेब), तुमचे विश्लेषण तंतोतंत खरे आहे. काँग्रेसने आजवर वंचित घटकांना केवळ निवडणुकीपुरते वापरले, सत्तेत कधीही मानाची भागीदारी दिली नाही. हे मी अनेक वर्षांपासून मांडत आलो आहे आणि म्हणूनच काँग्रेसच्या त्या अन्यायाला कंटाळून 2011 मध्ये मी काँग्रेसला कायमचा रामराम ठोकला होता.” ऐक्याशिवाय पर्याय नाही “दुर्दैवाची बाब अशी आहे की, आपण आज विखुरलेले आहोत म्हणूनच आपल्याला प्रत्येक वेळी डावलले जाते. त्यामुळे कोणाच्या निमंत्रणाची वाट पाहत बसण्यापेक्षा आपण स्वतःच इतकी प्रचंड राजकीय ताकद उभी केली पाहिजे की, कोणालाही आपल्याला बाहेर ठेवणे शक्य होणार नाही. सत्ता असो वा मीडियातील हक्काचे प्रतिनिधित्व, त्याचा राजमार्ग केवळ आणि केवळ रिपब्लिकन ऐक्यातूनच जातो.” बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करूया “स्वतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (RPI) संकल्पना मांडली होती. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि संविधानाची ही वैचारिक धुरा पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाला नवी दिशा दिली पाहिजे. बाळासाहेब, बाबासाहेबांचे स्वप्न साकारण्यासाठी आता एकत्र येऊया!” नागालँडपासून ईशान्य भारतापर्यंत आरपीआयचा विस्तार सत्तेतील भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करताना आठवले यांनी आपल्या पक्षाच्या वाटचालीचा दाखला दिला. “किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर आमचा रिपब्लिकन पक्ष केंद्रात एनडीए (NDA) आणि महाराष्ट्रात महायुतीसोबत खंबीरपणे काम करत आहे. या सत्तेतील भागीदारीमुळे समाजातील लाखो गरीब, शोषित आणि शेवटच्या घटकाची कामे होत असून त्यांच्या पाठीशी शासनाची ताकद उभी राहत आहे.” राष्ट्रीय स्तरावर वाढते बळ “आज रिपब्लिकन पक्ष एका राष्ट्रीय पक्षाच्या रूपात देशभरात विस्तारत आहे. नागालँड विधानसभेत आमचे दोन आमदार निवडून आले असून ईशान्य भारतातील जनतेचा आजही पक्षाला मोठा पाठिंबा मिळत आहे. आगामी निवडणुकांमध्येही पक्ष संपूर्ण ताकदीने उतरणार आहे.” प्रकाश आंबेडकरांचे ते ट्विट; ज्यावरून विरोधकांची कोंडी झाली रामदास आठवले यांनी ज्या वक्तव्याला पाठिंबा दिला, त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि विरोधकांच्या आघाडीवर (इंडिया आघाडी/महाविकास आघाडी) अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले होते. “ज्या आघाडीमध्ये दलित, आदिवासी, ओबीसी आणि बौद्ध समाजाच्या खऱ्या प्रतिनिधींना सामील होण्याचे साधे आमंत्रणही दिले जात नाही, त्याला विरोधी पक्ष किंवा खरी लोकशाही आघाडी म्हणता येईल का? काँग्रेस आणि तथाकथित लिबरल्सना एकतर सर्व काही स्वतःच्या मर्जीने चालवायचे असते किंवा या उपेक्षित समाजांनी त्यांचे राजकीय गुलाम व अनुयायी बनून राहावे, अशी त्यांची अपेक्षा असते. हा अत्यंत उघड जातीवादी दृष्टिकोन नाही का?” मीडियाच्या मौनावर सवाल “या राजकीय बहिष्कारावर आणि उपेक्षित घटकांच्या गैरहजेरीवर मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे, विश्लेषक आणि पत्रकार प्रश्न का विचारत नाहीत, हे अधिक चिंताजनक आहे. म्हणूनच अशा राजकीय भेदभावाची पोलखोल करण्यासाठी आणि विरोधकांना जाब विचारण्यासाठी आपल्याला स्वतःच्या स्वतंत्र माध्यमांची गरज आहे.” रिपब्लिकन ऐक्याच्या नव्या समीकरणांची चर्चा राजकीय रणधुमाळीत विरोधकांकडून वंचित बहुजन आघाडीला बाजूला ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी थेट आंबेडकरांनाच हाक दिल्याने आंबेडकरी चळवळीत आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर एकाच वेळी प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले या दोघांनीही नेमके बोट ठेवल्याने, आता प्रकाश आंबेडकर या ऐक्याच्या आवाहनाला काय प्रतिसाद देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ——————————————————————— हेही वाचा… दर जाहीर न करता ऊस तोडायला बापाची पेंड आहे का?: 8 वर्षे MSP वाढली नाही, राजू शेट्टींची वळसे पाटलांवर टीका; बेमदुत राष्ट्रीय महामार्ग रोखणार “यंदाच्या गाळप हंगामात उसाला प्रतिटन 5500 रुपये दर मिळावा ही शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे. साखरेची किमान विक्री किंमत (MSP) 50 रुपये आणि इथेनॉलचा दर 70 रुपये करा, अशी स्पष्ट मांडणी आम्ही केली आहे. तुम्ही वर्षानुवर्षे राष्ट्रीय व राज्य साखर संघाचे अध्यक्ष म्हणून केवळ खुर्च्या उबवल्या; तरी गेल्या आठ वर्षांत साखरेची एमएसपी वाढली नाही, तेव्हा तिथे बसून काय गोट्या खेळत होता का? आणि आता शेतकऱ्यांना दर जाहीर न करता थेट ऊस तोडायला ती काय तुमच्या बापाची पेंड आहे का?”, अशा अतिशय आक्रमक शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
काँग्रेसच्या दयेवर जगण्यापेक्षा एकत्र या!:कोणाची बाहेर ठेवण्याची हिंमत होणार नाही; रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना रिपब्लिकन ऐक्याची साद