Headlines

रोहित पवारांचे कष्ट मान्य, पण विद्यार्थ्यांच्या पदरात शून्य!:भीमनवार सक्तीने नव्हे तर हवापालटासाठी रजेवर; सुषमा अंधारेंचा रोहित पवारांवर पलटवार




“पुण्यात 12 दिवस चाललेले MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन म्हणजे ‘आम्ही युद्धात जिंकलो पण तहात हरलो’ अशी गत झाली आहे. रोहित पवारांनी या आंदोलनाला दिवस-रात्र वेळ दिला, त्यांचे कष्ट आणि योगदान मोठे आहे; पण या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या पदरात काहीच पडले नाही, हेच कटू वास्तव आहे. एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा झाला नाही, डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीवर निर्णय झाला नाही आणि विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत साधी लेखी स्पष्टताही नाही. पदवीधर निवडणुकीत फटका बसू नये म्हणून फडणवीसांनी ही थातुरमातुर खेळी केली,” अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. पुण्यातील डेक्कन येथील सेनाभवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे यांनी पुणे पदवीधर निवडणुकीसाठी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सुनील मोदी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ऐनवेळी स्वतंत्र उमेदवार दिल्याने शिवसेनेला ही जागा लढावी लागत असल्याचे सांगत, त्यांनी महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावावर थेट बोट ठेवले. याल तर सोबत, नाहीतर तुमच्याशिवाय लढणार! विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत पडलेली फूट आता चव्हाट्यावर आली आहे. “आम्ही कोणाला पाठिंबा दिलेला नाही, तर पक्षाच्या अधिकृत ‘एबी’ फॉर्मवर सुनील मोदी यांना उमेदवारी दिली आहे. कोल्हापूर महापालिकेत तीन वेळा नगरसेवक, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते आणि शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून तब्बल 12 वर्षे काम केलेले सुनील मोदी हे उच्चशिक्षित व अनुभवी व्यक्तिमत्त्व आहे.” ऐनवेळी पवारांच्या पक्षाकडून उमेदवार “जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेत ही जागा शरद पवार यांच्या पक्षाला आणि छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेला देण्याचे ठरले होते. मात्र, पवार साहेबांच्या पक्षाने संभाजीनगरमध्ये ऐनवेळी उमेदवार दिला आणि इकडेही प्रताप पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांनी दुपारी 2 वाजता अर्ज भरल्यानंतर, पक्षाच्या आदेशाने सुनील मोदी यांनी 2 वाजून 59 मिनिटांनी आपला अधिकृत अर्ज दाखल केला. माघारीच्या दिवशी चर्चा होऊनही त्यांनी माघार घेण्यास नकार दिला.” गृहीत धरणे चालणार नाही “मतांचे विभाजन टाळण्याचा ठेका फक्त एकट्या शिवसेनेनेच घेतलेला नाही. आम्ही दरवेळेला सरोगसी मदरहुड का सांभाळावे? सर्वसंमतीने आणि विश्वासात घेऊन निर्णय झाले नाहीत, तर शिवसेना आपला स्वाभिमान सोडणार नाही. आम्ही राजकीयदृष्ट्या धूर्त नसू, पण दुर्बल मुळीच नाही. ‘याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय’ हीच आमची भूमिका आहे. पुणे, विदर्भ आणि मराठवाडा या तिन्ही पदवीधर जागांवर शिवसेना (UBT) पूर्ण ताकदीने लढणार असून सुनील मोदी ही जागा जिंकून आणतील.” मशाल चिन्हाचा गैरवापर रोखणार “इतर उमेदवारांच्या प्रचार पत्रकांवर शिवसेनेचे ‘मशाल’ चिन्ह छापल्याचे निदर्शनास आले आहे. शिवसेनेचा अधिकृत उमेदवार रिंगणात असताना अशी पत्रके खपवून घेतली जाणार नाहीत. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार नोंदवली आहे.” भीमनवारांची सक्तीची रजा नव्हे, तर हवापालट! पुण्यातील एमपीएससी आंदोलनाच्या स्थगितीवर बोलताना सुषमा अंधारे यांनी आंदोलनाच्या फलनिष्पत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवले असते, तर तसे ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असते. पण भीमनवारांनी स्वतः ट्वीट केले की ‘मी स्वतः रजेवर जात आहे’. हा त्यांचा एटीट्यूड आहे की ‘तुम्ही मला काढू शकत नाही, मी स्वतःहून जात आहे’. वाल्मीक कराड किंवा पुतळा दुर्घटनेतील आरोपी ज्याप्रमाणे स्वतः हजर झाले, तसेच भीमनवार सक्तीने नाही, तर केवळ काही दिवसांच्या हवापालटासाठी बाजूला गेले आहेत.” मूळ मागण्यांचा पत्ताच नाही “परीक्षेतील डिस्क्रिप्टिव्ह (विश्लेषणात्मक) पद्धतीमुळे एकाच उत्तराला एकाला 2 तर दुसऱ्याला 10 गुण मिळतात. ही त्रुटी दूर करून पुन्हा ऑब्जेक्टिव्ह पद्धत आणण्याची विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती, त्यावर काहीच झाले नाही. परीक्षांच्या तारखांमधील घोळ कायम आहे. मग आंदोलनातून नक्की काय मिळाले?” विश्रामबाग पोलिसांची दिलगिरी कुठे? “विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द झाल्याचे कोणतेही अधिकृत आदेश निघालेले नाहीत. विश्रामबाग पोलीस ठाण्याने विद्यार्थ्यांच्या घरमालकांना माहिती मागवून धमकावणारा फतवा काढला होता, त्या पोलीस अधिकाऱ्याने साधी दिलगिरीही व्यक्त केलेली नाही.” आंदोलक विद्यार्थ्यांवर उद्या सूडबुद्धीने कारवाई होणार नाही कशावरून? भाजप नेत्यांच्या भूमिकेचा समाचार घेताना त्या म्हणाल्या, “भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ‘अर्बन नक्षल’ संबोधले होते. आंदोलन मागे घेताना पाचपुते किंवा मध्यस्थी करणाऱ्या शिवेंद्रराजे भोसले यांनी या शब्दांबद्दल दिलगिरी व्यक्त केली का? नाही. विवेकानंद पाटील यांच्यासारख्या ज्या तरुणांनी मंचावरून सरकारला थेट ललकारले, त्यांची नावे उद्या प्रशासनाच्या गोपनीय अहवालात नोंदवली जातील. हे विद्यार्थी उद्या पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले, तरी मुलाखतीदरम्यान सरकार त्यांच्याशी पूर्वग्रहदूषित आणि सूडबुद्धीने वागणार नाही याची गॅरंटी कोण देणार?” पदवीधर निवडणुकीसाठी तात्पुरती मलमपट्टी “पुण्यात विद्यार्थ्यांचा उद्रेक हाताबाहेर गेला होता. पदवीधर निवडणुकीत या सुशिक्षित तरुणांच्या रोषाचा फटका सत्ताधाऱ्यांना बसू नये, म्हणूनच ‘गावठी चाणक्य’ देवेंद्र फडणवीस यांनी थातूरमातूर मार्ग काढून तात्पुरती सारवासारव केली आहे.” रोहित पवारांचे कष्ट मान्य, पण विद्यार्थ्यांच्या पदरात शून्य! आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेबाबत विचारले असता अंधारे म्हणाल्या, “रोहित पवार यांनी या आंदोलनासाठी सलग 12 ते 13 दिवस दिले, दिवस-रात्र ते तिथे थांबले. त्यांच्या या समर्पणाचे आणि कष्टांचे क्रेडिट त्यांना नक्कीच मिळाले पाहिजे. मात्र, त्यांनी मध्यस्थी करून चर्चा केली असली तरी अखेर विद्यार्थ्यांच्या पदरात काहीच पडले नाही, हे नाकारता येणार नाही. मराठा आरक्षण आंदोलनासारखीच अवस्था या आंदोलनाची झाली असून, सरकारने विद्यार्थ्यांची केवळ क्रूर चेष्टा केली आहे.” निवडणूक आयोगावर ताशेरे आणि ठाकरेंच्या लढ्याचे समर्थन मुंबईतील आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले. “केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतचोरीत मदत केली असून, राहुल गांधींनी मागितलेला डिजिटल डेटा ते का देत नाहीत? निवडणूक आयोगाच्या या भूमिकेविरोधात देशभर संताप आहे.” आदित्य आणि अमित ठाकरेंवर गुन्हे “मुंबईत आंदोलनादरम्यान आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. सत्तेतील वाया गेलेल्या केस असण्यापेक्षा लोकशाहीच्या रक्षणासाठी अंगावर केसेस पडणे हे कधीही सन्मानाचे आहे. शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेचे नेते रस्त्यावर उतरले आहेत,” असा ठाम विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला. ————————————————————– हेही वाचा… काही जण परदेशी शक्तींचे बाहुले झालेत: कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस, राहुल गांधींच्या मोर्चावर एकनाथ शिंदेंची टीका संविधान हातात घेत ते धोक्यात आहे, असे म्हणत ते कसे नष्ट होईल, हे काम काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून सुरू आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. दिल्लीत जी काही राजकीय आंदोलने झाली, ती काही साधी बाब नाही; हे देशासाठी घातक आहे. अनेक परकीय शक्ती देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. काही जण परदेशी शक्तींचे बाहुले झाले आहेत. हा सर्व आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाचा भाग असल्याची शंका येत असून, देशाला अशांत करण्याचे आणि अराजकता माजवण्याचे कृत्य विरोधी पक्षाकडून सुरू आहे; जे अतिशय दुर्दैवी असून देशासाठी घातक आहे, असेही ते म्हणाले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *