![]()
मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. सुधारित वेळापत्रकानुसार दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून, अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. दावे-हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढ विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील नावे आणि तपशील तपासून आवश्यक दावे किंवा हरकती दाखल करण्याची संधी मतदारांना देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी आता २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या किंवा नोंदीमध्ये त्रुटी आढळलेल्या पात्र नागरिकांना आवश्यक अर्ज दाखल करता येणार आहेत. सुधारित वेळापत्रक काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, दावे आणि हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६ असा आहे. दाखल झालेल्या दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदारांनी काय करावे? पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव आणि वैयक्तिक तपशील तपासून घ्यावेत. यादीत नाव नसल्यास नाव समाविष्ट करण्यासाठी, नोंदीमध्ये चूक असल्यास दुरुस्तीसाठी किंवा आवश्यक असल्यास हरकत नोंदवण्यासाठी २६ ऑक्टोबरपूर्वी संबंधित अर्ज दाखल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पात्र मतदारांचा मतदानाचा हक्क सुनिश्चित करण्यावर भर मतदार यादी अचूक आणि अद्ययावत ठेवणे तसेच प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, हा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे मतदारांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन प्रारूप मतदार यादीतील आपली नोंद तपासावी आणि आवश्यक प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करावी. असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. सुधारित वेळापत्रक फॉर्म ६, ७ आणि ८ चा वापर कशासाठी ? फॉर्म ६ : नव्याने मतदार यादीत नाव नोंदणी, नवीन ठिकाणी यादीत नाव समावेशासाठी हा फॉर्म वापरला जातो. फॉर्म ७ : मतदार यादीतील नावावर आक्षेप घेणे किंवा नाव कायमचे कमी करण्यासाठी. दुबार नाव वगळण्यासाठी. फॉर्म ८ : नाव, वय, पत्ता, जन्मतारीख, लिंग, नातेवाईकाचे नाव किंवा फोटो आदीत दुरुस्तीसाठी. ———— हेही वाचा.. एसआयआर : राज्यात 2 कोटी नावे कट:दुरुस्तीसाठी केवळ 6.24 लाख अर्ज, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले जिल्हानिहाय आकडे महाराष्ट्रात विशेष सघन पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत मसुदा मतदार यादी प्रसिद्धीनंतर ३६ जिल्ह्यांमध्ये नवीन मतदार, आक्षेप आणि नाव, फोटो आदी दुरुस्तीसाठी ६ लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. पुण्यात सर्वाधिक ५६,६०५ अर्ज आले आहेत. मसुदा यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली. त्यात ९,७८,५४,०४९पैकी ७,७१,६५,५६२ मतदारांचा यादी समावेश करून २,०६,८८,४८७ म्हणजेच २१.१४ टक्के मतदारांची नावे वगळण्यात आली होती. नावे वगळण्याच्या संख्येत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. सविस्तर वाचा
Source link
मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी आता 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ:मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार अंतिम यादी