Headlines

इगतपुरीत ७२ तासांत ६१५ मिमी:३० दिवसांचा पाऊस तीनच दिवसांत; भावली, भाम धरणे ओव्हरफ्लो




इगतपुरी तालुक्यात ७२ तासांत तब्बल ६१५ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली असून, अवघ्या तीन दिवसांत महिनाभराचा पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, पूर, दरडी कोसळणे आणि रस्ते खचण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. पावसामुळे भावली, भाम आणि दारणा धरणे ओव्हरफ्लो झाली असून, दारणा धरणातून विक्रमी १९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या आपत्कालीन परिस्थितीची दखल घेत आमदार हिरामण खोसकर यांनी तालुक्यातील विविध बाधित भागांचा पाहणी दौरा केला. पिंपरीसदो, दरेवाडी, घोटी शहर, पूरग्रस्त भाग तसेच नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले. दरेवाडीतील पूरग्रस्त २१ कुटुंबांच्या घरांची उंची वाढविणे, कायमस्वरूपी रस्ता उभारणे आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. मांजरगाव रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आमदार हिरामण खोसकर यांनी घटनास्थळी पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाला तातडीने दरड हटविण्याचे आदेश दिले. पाहणीनंतर युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *