![]()
पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे यांनी ‘इ-चलन’ कारवाईतून वाहतूकदारांना मुक्त करण्याची मागणी केली आहे. शासनाने यावर तोडगा न काढल्यास राज्यात पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. ही मागणी असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या ‘इ-चलन’ कारवाईविरोधात वाहतूकदारांनी यापूर्वी मुंबईतील आझाद मैदान आणि पुण्यातील आरटीओ कार्यालयावर आंदोलने केली आहेत. तरीही या समस्येवर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही, अशी नाराजी भेगडे यांनी व्यक्त केली. पिंपरी येथे झालेल्या पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये पिंपरी चिंचवड आरटीओचे पवन नवादे, महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी, बोकी वेस्ट झोनचे उपाध्यक्ष किरण देसाई, पुणे बस असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे, पिंपरी चिंचवड बस असोसिएशनचे कार्याध्यक्ष दीपक कलापुरे, उपाध्यक्ष बाळासाहेब बोराटे, दशरथ पानमंद, भाऊसाहेब घोमल, स्वामी गुजर, राहुल मुळे, देवदत्त रावल आणि राज्यातील विविध जिल्हा प्रतिनिधींचा समावेश होता. पुणे बस असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे यांनी युरो सिक्स वाहनांमुळे वाढलेल्या खर्चावर चिंता व्यक्त केली. नवीन तंत्रज्ञानामुळे वाहनांच्या देखभालीचा खर्च वाढला असून, ब्रेक डाऊनचे प्रमाणही वाढले आहे. टायर आणि सुटे भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे उत्पन्नावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने या किमती कमी करून वाहतूकदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी जुनवणे यांनी केली. बोकी वेस्ट झोनचे उपाध्यक्ष किरण देसाई यांनी व्यवसायातील अडचणींवर मात करण्यासाठी संघटनेच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. युद्धजन्य परिस्थितीमुळे लॉकडाउनसारखी स्थिती निर्माण होऊ शकते, यासाठी संघटनेने तयार राहावे. येणाऱ्या संकटांना संघटना एकत्रितपणे सामोरे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Source link
'ई-चलन' कारवाईतून मुक्त करा, अन्यथा आंदोलन:पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचा वार्षिक सर्वसाधारण सभेतून सरकारला इशारा