Headlines

PMPML बसच्या धडकेत जखमी कचरा वेचकाचा मृत्यू:कष्टकरी कुटुंबासाठी 10 लाख रुपये भरपाईची मागणी, संघटना आक्रमक




पौड रोड परिसरात गेल्या १५ वर्षांपासून घंटागाडीवर कचरा वेचक म्हणून कार्यरत असलेले मोहन पाराजी जगधने (वय ४३, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, कोथरूड) यांचा पीएमपीएमएल बसच्या धडकेत गंभीर अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे कचरा वेचकांच्या सुरक्षिततेचा आणि सामाजिक संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही दुर्घटना २४ एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कोथरूड येथील सह्याद्री हॉस्पिटलजवळ स्मिता एक्स्पर्टसमोर घडली. मोहन जगधने घंटागाडीवर काम करत असताना मागून आलेल्या पीएमपीएमएल बसने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात ते खाली पडून गंभीर जखमी झाले होते; त्यांच्या डोक्याला व मेंदूला गंभीर इजा झाली होती. अपघातानंतर तातडीने उपचार सुरू करण्यात आले, मात्र रुग्णालयात ५० हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागली. ही रक्कम कुटुंबीयांनी उसनवारी करून जमा केली. तब्बल २७ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २१ मे रोजी रात्री मोहन जगधने यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि दोन मुलगे असा परिवार असून, त्यांची पत्नीही कचरा वेचक म्हणून काम करतात. या घटनेनंतर कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेने पीएमपीएमएल प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका कष्टकरी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर केवळ ५० हजार रुपयांची मदत देण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित संवेदनशीलता दाखवली नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात संघटनेचे सरचिटणीस योगेश मंजुळा यांनी म्हटले आहे की, “कचरा वेचक शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, तरीही त्यांच्या सुरक्षितता आणि आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते. या मृत्यूमुळे त्यांच्या सामाजिक संरक्षणाचा मुद्दा गंभीरपणे पुढे आला आहे.” संघटनेने मोहन जगधने यांच्या कुटुंबाला तातडीने १० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच, पुणे महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे कचरा वेचकांसाठी अंशदायी आरोग्य योजना लागू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *