![]()
उजनी जलाशयावर प्रस्तावित एआय डेटा सेंटर, सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन एनर्जी यांसह अन्य प्रकल्पांना समर्थन देणाऱ्या नेत्यांविरोधात धरणग्रस्त, मच्छीमार आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पांना पाठिंबा देणाऱ्या नेतृत्वाचा प्रतीकात्मक ‘दशक्रिया विधी’ करून आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. यासंदर्भात शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन देण्यात आले. उजनी जलाशयावर पाच मोठे प्रकल्प उभारण्याचा शासनाचा मनोदय असून, त्याचा जलाशयावर अवलंबून असलेल्या शेतकरी, मच्छीमार आणि अन्य घटकांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली आहे. उजनी धरणाच्या उभारणीसाठी कोणतेही योगदान नसलेल्या काही नेत्यांकडून या प्रकल्पांना समर्थन दिले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अशा नेतृत्वाचा प्रतीकात्मक दशक्रिया विधी करून लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. उजनी प्रकल्प रद्द करण्यासाठी शेतकरी प्राणपणाने लढा देतील, असा इशाराही देण्यात आला आहे. हे आंदोलन गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी चिकलठाण येथील उजनी जलाशय परिसरातील कोटलिंग मंदिर येथे करण्यात येणार आहे. आंदोलनाची पूर्वसूचना मुख्यमंत्री, सोलापूर जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग, कार्यकारी अभियंता तसेच करमाळा पोलीस ठाण्याला निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
Source link
उजनीच्या प्रकल्प समर्थकांचा प्रतिकात्मक ‘दशक्रिया विधी’:19 नोव्हेंबरला कोटलिंग मंदिर परिसरात आंदोलन