![]()
प्रतिनिधी | अकोला उन्हाळ्याची तीव्रता आणि वाढते तापमान लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ संलग्न पाचही जिल्ह्यांमध्ये ‘उष्माघात विद्यार्थी मदत कक्ष’ स्थापन करण्यात आले आहेत. विद्यार्थी विकास विभागाच्या पुढाकारातून राबवण्यात येणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि काळाची गरज ओळखणारा ठरत आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय मदत कक्षांची स्थापना करण्यात आली. अकोला येथे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांच्या अध्यक्षतेखाली श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कक्ष सुरू करण्यात आला आहे. अमरावती ग्रामीण भागात प्राचार्य डॉ. अतुल बोडके यांच्या नेतृत्वाखाली जे. डी. पाटील महाविद्यालय, दर्यापूर येथे, अमरावती शहरात महिला महाविद्यालयात, बुलडाणा जिल्ह्यात प्राचार्य डॉ. तडवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एस. कॉलेज, खामगाव, यवतमाळ येथे बाबाजी दाते महाविद्यालयात तसेच वाशीम येथे आर. ए. कॉलेजमध्ये मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय समित्यांमार्फत प्रत्येक परीक्षा केंद्राला भेट देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हाती घेतलेला हा उपक्रम सामाजिक जाणीव आणि विद्यार्थी हिताची प्रभावी जपणूक करणारा ठरत आहे. विद्यार्थ्यांना उष्माघातापासून संरक्षण मिळावे यासाठी गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन बुंदेले यांच्या वतीने पाचही जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर सुमारे ७५० ओआरएस पॅकेट्सचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतची सामाजिक बांधिलकी जपत प्रतिष्ठानने घेतलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.विद्यापीठ प्रशासनाने सर्व संलग्न महाविद्यालयांना महाविद्यालय स्तरावरही उष्माघात मदत कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कक्षांमार्फत प्रथमोपचार सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, ओआरएस, जनजागृती फलक तसेच विद्यार्थ्यांसाठी सावलीची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Source link
उन्हाळी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पाचही जिल्ह्यात उष्माघात विद्यार्थी मदत कक्ष:गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे ७५० ओआरएस वाटप