![]()
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी दिलेल्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अमूल्य संदेशातून प्रेरणा घेत, शहरात ‘एक कुटुंब – एक झाड’ हा संकल्प साकारण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना मोफत फळझाडे आणि देशी वृक्षांचे वाटप करून ‘हरित अहिल्यानगर घडवण्याचा संकल्प करण्यात आल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले. तपोवन रोडवरील लक्ष्मीनगर परिसरात वृक्षारोपण करून आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त या ‘हरित अहिल्यानगर संकल्प अभियानाचा’ शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी संपत बारस्कर यांच्यासह नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, सरचिटणीस गणेश बोरुडे, दिनेश खेडकर, दीपक गायकवाड, पारस गायकवाड, प्रदीप कारले आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बारस्कर म्हणाले, वाढते प्रदूषण, कमी होत चाललेले हरित क्षेत्र आणि हवामान बदलाच्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. “पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जिम्मेदारी आहे. केवळ वृक्ष लावण्यापुरता कार्यक्रम न ठेवता प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावून त्याचे वर्षभर मुलाप्रमाणे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी केले. शहराला निरोगी बनवण्यासाठी लोकसहभागातून ही चळवळ पुढे नेली जाईल, असेही ते म्हणाले. यावेळी लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, मागील वर्षी या परिसरात जे वृक्षारोपण करण्यात आले होते, ती सर्व झाडे आज योग्य संगोपनामुळे मोठी झाली आहेत. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे परिसराचा कायापालट होत असून, उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक घरातून पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला. गेल्या वर्षी लावलेली झाडे आज डोलू लागली नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी संपत बारस्कर यांच्या गेल्या दहा वर्षांतील पर्यावरण क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. प्रभागात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून नागरिकांना यात सहभागी करून घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘एक कुटुंब – एक झाड’ हा संकल्प अधिक व्यापक स्वरूपात राबवून नागरिकांचा सक्रिय सहभाग घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Source link
"एक कुटुंब-एक झाड' संकल्पनेतून अहिल्यानगर हरित करणार- बारस्कर:तपोवन रस्त्यावरील लक्ष्मीनगर परिसरात मोफत फळझाडे व देशी वृक्षांचे वाटप