![]()
येथील ऐतिहासिक व पवित्र श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आयोजित ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी चिंतन (स्थितप्रज्ञदर्शन) सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात सांगता झाली. याप्रसंगी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी, प्रत्येक मनुष्याने मनात पवित्र भाव ठेवून जीवनात एकदा तरी ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीचे वाचन व पारायण करावे, असे आवाहन केले. पुरुषोत्तम अधिक मासाचे औचित्य साधून माऊलींच्या मंदिरात या विशेष चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सांगतेच्या दिवशी आपल्या मधुर वाणीतून काल्याचे कीर्तन सादर करताना म्हस्के महाराजांनी उपासनेचे महत्त्व अधोरेखित केले. योग्य उपासनेमुळे मनुष्याच्या चित्ताला स्थैर्य लाभते आणि त्यातूनच खऱ्या परमार्थाची प्राप्ती होते. कोणतेही चांगले कर्म जर निष्काम भावनेने केले, तर चित्तशुद्धी होते, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. भगवंताविषयीची श्रद्धा, भक्ती आणि निष्ठा नेहमी दृढ ठेवावी, असे सांगतानाच भाविकांनी महिन्याच्या प्रत्येक वद्यवारीला माऊलींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. या सोहळ्याच्या सांगता प्रसंगी श्रीसंत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानाचे सर्व विश्वस्त आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विश्वस्त मंडळाचे ज्ञानदेव माऊली शिंदे, शंकर महाराज तनपुरे, ओम महाराज शिंदे, चैतन्य महाराज आढाव, गौरव महाराज तनपुरे, शहाजी महाराज शिंदे, अमर महाराज देशमुख, सदाशिव महाराज पवार, नानाभाऊ म. चौधरी, चांगदेव महाराज कर्डिले, मार्तंड बाबा चव्हाण, चोपदार खामकर महाराज, भानुदास महाराज गटकळ, विष्णुपंत कोकणे, शंकर मामा ठोंबळ, भाऊसाहेब महाराज चौधरी, गायके मिस्त्री आदींचा समावेश होता.
Source link
जीवनात एकदा तरी ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीचे वाचन व पारायण- देविदास महाराज म्हस्के, नेवाशात ग्रंथराज ज्ञानेश्वरी चिंतन सोहळ्याची सांगता, भाविकांची मोठी गर्दी