![]()
दररोज हजारो आणि वर्षाकाठी करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत साईबाबांच्या प्रसादाच्या नावाखाली काही व्यावसायिकांकडून भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. साई मंदिर परिसराबाहेर खाजगी दुकानांमध्ये बुरशीयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची सर्रास विक्री होत असल्याचे वृत्त माध्यमांनी उघडकीस आणताच, वर्षानुवर्षे झोपलेले अन्न व औषध प्रशासन (एफडीए) जागे झाले आहे. कडक शिस्तीचे अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या संभाव्य कारवाईच्या धसक्याने स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने शिर्डीत धाव घेत प्रसाद विक्रेत्यांच्या दुकानांवर मंगळवारी सायंकाळपासून छापेमारी सुरू केली. जगभरातून येणारे भाविक श्रद्धेने येथील खाजगी दुकानांमधून कुटुंबासाठी पेढा प्रसाद म्हणून खरेदी करतात. मात्र, या दुकानांतील पेढ्यांवर ना उत्पादकाचे नाव आहे, ना पॅकेजिंगची तारीख, ना एक्सपायरी डेट! अनेक ठिकाणी दगडासारखे कडक झालेले आणि बुरशी लागलेले पेढे भाविकांच्या माथी मारले जात आहेत. शिर्डी नगरपरिषद आणि एफडीएच्या या प्रकाराकडील दीर्घकालीन दुर्लक्षावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “हा आमच्या श्रद्धेशी आणि आरोग्याशी केलेला क्रूर खेळ आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका भाविकाने दिली.सायंकाळी अन्न व औषध प्रशासनाचे पथक शिर्डीत दाखल झाले असून त्यांनी पेढ्यांचे नमुने (सॅम्पल) गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. वर्षानुवर्षे डोळेझाक करणारे अधिकारी आता अचानक सरसावल्याने शिर्डीतील भेसळखोरांमध्ये घबराट पसरली आहे. निकषांची पूर्तता करूनच संस्थानच्या प्रसादाची विक्री साईबाबा संस्थानकडून दर्शन रांगेतील भाविकांना प्रसाद म्हणून बुंदीचे पाकीट मोफत वितरित केले जाते. तसेच संस्थानच्या वतीने साजूक तुपात तयार केलेल्या लाडू प्रसादाची विक्री अधिकृत काउंटरवरून केली जाते. हा प्रसाद गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा निकषांची पूर्तता करूनच भाविकांपर्यंत पोहोचविला जातो. मात्र, शहरातील काही खासगी विक्रेते “साईंचा प्रसाद’ या नावाखाली पेढ्यांची विक्री करीत असल्याची बाब समोर आली आहे. अनेक भाविक श्रद्धेपोटी हे पेढे खरेदी करतात. मात्र घरी गेल्यानंतर किंवा सेवन केल्यानंतर त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याचे लक्षात येत असल्याच्या तक्रारी वारंवार पुढे येत आहेत. शिर्डी शहर व परिसरातील प्रसाद विक्रेत्यांकडील पेढ्यांचे नमुने घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. संकलित केलेले सर्व नमुने नियमानुसार सील करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाच्या महिला अधिकाऱ्यांनी सांगितले.
Source link
कारवाईचा बडगा:शिर्डीत साईप्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी "धोकादायक' खेळ!