Headlines

‘एक गाव, एक गणपती’व डीजेमुक्त उत्सवाचा निफाड पोलिसांचा आग्रह:गावातील एकोपा वाढवण्यासह ध्वनिप्रदूषण टाळण्याचे आवाहन‎




आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावागावांत ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेतून डीजेमुक्त उत्सव साजरा करावा, उत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड द्यावी तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता त्याची सत्यता पडताळून पाहावी, असे आवाहन निफाड पोलिसांनी केले. यासाठी पोलिस पाटलांनी गावपातळीवर नागरिक, गणेश मंडळे व ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून पोलिसांशी समन्वय साधावा, अशा सूचना देण्यात आल्या. आगामी गणेशोत्सवात निफाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गणेशोत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा व्हावा, यासाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस पाटलांची विशेष बैठक पोलिस ठाण्यात घेण्यात आली. बैठकीत गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत विविध महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. बैठकीस पोलीस निरीक्षक सारिका आहिरराव तसेच नुकतीच चांदवड येथे बदली झालेले पोलिस निरीक्षक अभिजित सोनवणे उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या काळात गावागावांत शांतता व सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी पोलीस पाटलांनी गावपातळीवर नागरिक, गणेश मंडळे तसेच ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव शक्यतो ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेतून साजरा करण्यावर पोलिसांनी विशेष भर दिला. गावातील विविध मंडळे व नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सलोखा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना करण्यात आली. एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा केल्यास अनावश्यक स्पर्धा, खर्च तसेच मंडळांमधील मतभेद टाळण्यास मदत होऊन उत्सवाला अधिक विधायक स्वरूप प्राप्त होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शक्यतो डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, व्यसनमुक्ती, रक्तदान, वृक्षारोपण यांसारख्या सामाजिक उपक्रमांशी जोडण्याची गरज असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. यावेळी लक्ष्मण आहेर, संजय तळेकर, रवींद्र शिंदे, भाग्यश्री बोरसे, रोहिणी शिंदे आदींसह पोलिस पाटील उपस्थित होते. पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव व नुकतीच चांदवड येथे बदली झालेले अभिजित सोनवणे यांचा सत्कार करताना तालुक्यातील पोलिस पाटील. गणेशोत्सवाच्या काळात वेळोवेळी माहिती देऊन सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता त्याची सत्यता पडताळून पाहावी. पोलिस पाटील व ग्रामस्थांनी पोलिसांशी समन्वय ठेवावा, असे आवाहन करण्यात आले. गावातील गणेश मंडळांनी उत्सवाच्या काळात शिस्त, शांतता आणि सामाजिक सलोखा राखत प्रशासनाला सहकार्य करावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *