Headlines

एमपीएससी गैरप्रकारांविरोधात विद्यार्थ्यांचा पुण्यात आक्रोश मोर्चा:खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; चौकशीची मागणी.




पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि निकालातील गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी सोमवारी आक्रोश मोर्चा काढला. विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. सकाळपासूनच ओंकारेश्वर मंदिर परिसरात राज्याच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाला. एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा देऊन त्यांच्या जागी स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय, गट-ब परीक्षेतील आक्षेपांवर त्वरित स्पष्टीकरण देऊन गैरप्रकारांची चौकशी करावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली. राज्यसेवा मुख्य २०२५ आणि कृषीसेवा परीक्षेच्या वर्णनात्मक पेपर तपासणीतील चुकांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मुंबई क्राईम ब्रँचने एमपीएससीला दिलेला प्राथमिक चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली. अटकेत असलेले अवर सचिव अभिजित लेंडवे यांच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे, असेही विद्यार्थी म्हणाले. लेंडवे, मराठे आणि नखाते यांच्या सेवाकाळातील नियुक्त्या व पदोन्नतीच्या निकषांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. या प्रकरणात संबंधित आरोपींच्या संपर्कात असलेल्या निवड झालेल्या उमेदवारांचे संपर्क तपशील तपासले जावेत, असेही त्यांनी सांगितले. प्रवीण पाटील आणि मयूर ठाकरे यांच्याव्यतिरिक्त इतर संस्थांच्या सहभागाची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली. इतर परीक्षांच्या निकालांबाबत विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यासाठी स्वतंत्र चौकशी करावी आणि ‘डीआय’मधील संशयास्पद निकालांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे, असेही विद्यार्थ्यांनी म्हटले. दरम्यान, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी गट-क पूर्व परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घ्यावी आणि लघुलेखक पद पुन्हा सुरू करावे, या मागण्याही विद्यार्थ्यांनी केल्या. मोर्चामुळे ओंकारेश्वर मंदिर परिसरासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गावर मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *