![]()
सध्या राज्यभरात डीजे बंदीच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. यावर समर्थनार्थ आणि विरोधात दोन स्पष्ट मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. अशा वादाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात बंजारा समाजाने आपल्या समृद्ध पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवत एक अत्यंत वेगळा आणि सकारात्मक संदेश दिला आहे. बंजारा समाजाच्या संस्कृतीतील महत्त्वाचा आणि पवित्र मानला जाणारा ‘तीज’ उत्सव आज मोठ्या उत्साहात पार पडला. मागील दहा दिवसांपासून बंजारा समाजातील तरुणींनी तिजाची श्रद्धेने पूजा केली होती. आज या उत्सवाची सांगता करताना तिजाचे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे, सध्याच्या डिजिटल युगात आणि डीजेच्या मोठ्या आवाजाच्या गर्दीत बंजारा समाजाने डीजेला पूर्णपणे फाटा दिला. त्याऐवजी पारंपरिक बंजारा ‘डफड्याच्या’ तालावर तरुणींनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत ठेका धरत सुंदर नृत्य सादर केले. आधुनिक होत असतानाच आपल्या मूळ पारंपरिक कला, संस्कृती आणि लोकवाद्यांचे जतन करणे गरजेचे आहे. केवळ आवाजाची अनावश्यक स्पर्धा करण्यापेक्षा आपल्या समृद्ध संस्कृतीचा खरा आवाज पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे अधिक महत्त्वाचे आहे, असा विचार प्रा. डी. बी. चव्हाण (नायक) आणि प्रांजली जाधव यांनी व्यक्त केला. डीजेच्या गोंधळाऐवजी पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरा झालेला हा तीज महोत्सव उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
Source link
नागपुरात बंजारा समाजाने पारंपरिक वाद्यांवर तीज उत्सव साजरा केला:डीजे बंदीच्या वादात दिला सकारात्मक संदेश; पारंपरिक वेशभूषेत डफड्याच्या तालावर केले नृत्य