![]()
हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याच्या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ता. ७ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन पिकाची होळी केली. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यापुढील आंदोलन मंत्रालया समोर केले जाईल असा इशारा देण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन, कापूस, हळद, उडीद, मूग, तुर, ज्वारी या पिकांची पेरणी झाली. मात्र जून महिन्यानंतर पावसाने उघडीप दिली. जुलै महिन्यात हलक्या पावसाने पिके तरली.मात्र ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने सोयाबीन पिकांना शेंगा भरण्याच्या अवस्थेतच पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेंगा भरल्याच नाही. या शिवाय इतर पिकांची वाढही खुंटली आहे. सध्या पिके वाळत असून खरीप हंगामाचे उत्पन्न हाती येणार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. हिंगोली जिल्ह्यात तब्बल २ लाख ६५ हजार शेतकऱ्यांनी सुमारे १ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रासाठी एचडीएफसी इर्गो या विमा कंपनीकडे पीक विमा काढला आहे. मात्र जिल्ह्यात गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असतानाही पीक विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी किंवा कृषी विभागाचा अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करताना दिसत नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने व विमा कंपनीने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करून नुकसानीचे सर्वेक्षण करावे, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी या माघणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन पिकाची होळी केली. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रवीण मते, अशोक जयस्वाल, विशाल पोळ, रमेश जाधव यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
Source link
'हिंगोलीत दुष्काळ जाहिर करा':जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन पिकाची होळी, क्रांतीकारी शेतकरी संघटना आक्रमक