![]()
जिंतूर तालुक्यातील वडाळी परिसरात एका मेंढपाळाच्या कळपातील तब्बल 44 मेंढ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. एकाचवेळी मोठ्या संख्येने मेंढ्या दगावल्याने संबंधित मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, या मेंढ्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील असालवाडी येथील मेंढपाळ पुणाजी समाधान येळे हे कुटुंबासह 300 हून अधिक शेळ्या-मेंढ्यांचा कळप घेऊन वडाळी परिसरात आले होते. त्यांनी शेतकरी प्रकाश दुभाळकर यांच्या गट क्रमांक 175 मधील शेतात कळपासह मुक्काम केला होता. शनिवारी सायंकाळच्या सुमारास कळपातील काही मेंढ्या अचानक आजारी पडू लागल्या. काही वेळातच त्यापैकी अनेक मेंढ्यांची प्रकृती खालावली आणि तब्बल 44 मेंढ्यांचा मृत्यू झाला. एवढ्या मोठ्या संख्येने मेंढ्या अचानक दगावल्याने परिसरातही चिंता व्यक्त केली जात आहे. मृत्यूचे नेमके कारण काय? मेंढ्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. दूषित चारा खाल्ल्याने विषबाधा झाली असावी किंवा एखाद्या संसर्गजन्य आजारामुळे मेंढ्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अधिकृत अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत मेंढ्यांची तपासणी करून आवश्यक नमुने घेण्यात आले. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतर या घटनेमागचे नेमके कारण समोर येईल. पोलिसांकडूनही पाहणी घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिंतूर पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक इंगोले, मुजगुळे तसेच हवालदार दीपक वाटोडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक नोंद केली. मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान शेळी-मेंढी पालन हा भटक्या मेंढपाळ कुटुंबांच्या उत्पन्नाचा प्रमुख आधार आहे. अशा परिस्थितीत एकाच वेळी ४४ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने पुणाजी येळे यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करून मृत्यूचे कारण लवकर स्पष्ट करावे, तसेच नुकसानग्रस्त मेंढपाळाला शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. हेही वाचा.. दुष्काळाचे संकट गडद:मराठवाड्यात सर्व धरणातले पाणी पिण्यासाठी राखीव, विभागीय आयुक्तांचा निर्णय; अल् निनोचा प्रभाव वाढला अल् निनोच्या वाढत्या प्रभावामुळे मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे संकट घोंघावते आहे. हे पाहून सर्व धरणातले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिलेत. परिस्थितीचे गांभीर्य पाहता रब्बी पिकांसाठीही या धरण्याती पाण्याचे नियोजन करण्यात येणार नाही.सविस्तर वाचा ..
Source link
वडाळीत 44 मेंढ्या अचानक दगावल्या:विषबाधा, दूषित चारा की आजार? मृत मेंढ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले