![]()
नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून टीका केली जात आहे. तसेच रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे असतानाच नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी आक्षेप घेणाऱ्यांना थेट ओपन चॅलेंज दिले आहे. रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत चूक दाखवा, मी माझे नाव बदलेन, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या रस्ते कामांच्या दर्जाबाबत विरोधक व नागरिकांकडून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर, महापालिका प्रशासनाने या कामांच्या तांत्रिक तपासणीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी त्र्यंबकनाका परिसरातील रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून बांधकाम पद्धत, वापरलेले साहित्य आणि तांत्रिक निकषांची अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली आणि रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची स्पष्ट भूमिका मांडली. काँक्रिट रस्त्यांची तज्ज्ञांकडून कसून पाहणी नाशिक शहरातील रस्त्यांच्या कामांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सध्या चार वेगवेगळ्या संस्थांमार्फत गुणवत्ता तपासणी केली जात असून, विशेषतः काँक्रिट रस्त्यांचा दर्जा तपासण्यासाठी ‘आयआयटी मुंबई’च्या तज्ज्ञांनीही प्रत्यक्ष पाहणी केली आहे. या तपासणी मोहिमेअंतर्गत शहरातील त्र्यंबकरोडवरील खडकाळी सिग्नल ते आयटीआय (ITI) सिग्नल, आयटीआय सिग्नल ते पिंपळगाव बहुला आणि गरवारे ते एक्सएल-ओ (XL-O) पॉइंट या तीन प्रमुख काँक्रिट रस्त्यांची तज्ज्ञांकडून कसून पाहणी करण्यात आली. कोअर कट पद्धतीने तांत्रिक पडताळणी तज्ज्ञांनी ‘कोअर कट’ पद्धतीचा अवलंब करून काँक्रिट रस्त्यांच्या प्रत्यक्ष जाडीची आणि तांत्रिक निकषांची सखोल तपासणी केली. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासणीमध्ये रस्त्यांची कामे निर्धारित मानकांनुसार योग्य असल्याचे निष्पन्न झाले असले तरी, यासंबंधीचा अंतिम निष्कर्ष तज्ज्ञांचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. IIT च्या अहवालानंतरच ठेकेदारांना बिले रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत महापालिकेने अत्यंत कठोर भूमिका घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत कामाच्या दर्जात तडजोड न करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आयआयटी मुंबई’चा अंतिम तपासणी अहवाल प्राप्त होऊन रस्त्यांची कामे योग्य दर्जाची असल्याची खात्री झाल्यानंतरच संबंधित ठेकेदारांना बिले अदा केली जाणार आहेत. यामुळे प्रशासनाने देयके देण्याची घाई न करता तांत्रिक तपासणी आणि गुणवत्तेलाच सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होते.
Source link
‘रस्त्यांच्या कामात चूक दाखवा, मी नाव बदलेन’:नाशिक महापालिका आयुक्तांचे थेट ओपन चॅलेंज; काँक्रिट रस्त्यांची तज्ज्ञांकडून कसून पाहणी