![]()
दारुल उलूम अमजदिया या धार्मिक संस्थेने मुस्लिम समाजासाठी एक महत्त्वाचा फतवा जारी केला आहे. सण-उत्सव, संदल आणि धार्मिक मिरवणुकांमध्ये डीजेच्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन, मुस्लिम समाजाने डीजे सिस्टीमचा वापर पूर्णपणे टाळावा, असे या फतव्यात म्हटले आहे. हा फतवा ‘अल जामेअतुर रज़विया दारुल उलूम अमजदिया’चे मुहतमिम मुज्तबा शरीफ खान अशहरी मिस्बाही यांच्या वतीने काढण्यात आला आहे. मुस्लिम धर्मात इतरांना त्रास होईल अशी कोणतीही कृती करणे मान्य नाही, असे त्यात स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोठ्या आवाजात डीजे वाजवून लोकांच्या आरोग्याला आणि शांततेला बाधा पोहोचवण्याला इस्लाममध्ये कोणतीही मान्यता नाही, असे या पत्रात म्हटले आहे. ईद, दर्ग्यांवरील धार्मिक कार्यक्रम तसेच संदलच्या मिरवणुकांमध्ये डीजे सिस्टीमचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश या फतव्यात दिले आहेत. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या फतव्याचे स्वागत केले आहे. इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असे काम करण्यास इस्लाम परवानगी देत नाही, असे ते म्हणाले. ध्वनीप्रदूषण कमी करण्यासाठी आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी धार्मिक संस्थेने घेतलेली ही भूमिका खूप चांगली आहे, असे खान यांनी सांगितले. प्यारे खान यांनी मुस्लिम समाजाला या फतव्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सध्या राज्यभरात ध्वनीप्रदूषण आणि डीजेच्या जास्त वापरावरून चर्चा सुरू आहे. दारुल उलूम अमजदियाच्या या निर्णयामुळे धार्मिक उत्सवांमध्ये शांतता आणि शिस्त राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
Source link
मुस्लिम समाजाने डीजेचा वापर पूर्णपणे टाळावा:दारुल उलूम अमजदियाचा फतवा; सण-उत्सव, संदल आणि मिरवणुकांमध्ये त्रास टाळण्यासाठी निर्णय