![]()
पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एल-निनोच्या प्रभावामुळे कमी पर्जन्यमानाचा अंदाज लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले. जलसंपदा विभागाने पावसाळ्यापूर्वी सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत आणि संबंधित यंत्रणांनी समन्वय साधावा, असेही ते म्हणाले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, कृषी, आरोग्य, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नगर परिषद, पोलीस आयुक्तालय, जिल्हा अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालय, पीएमआरडीए, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जलसंपदा, एनडीआरएफ आणि भारतीय हवामान विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अनेक उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि मुख्याधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, जलसंपदा विभागाने यावर्षी १५ ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन केले आहे. मात्र, एल-निनोच्या प्रभावामुळे २०२७ मध्ये फेब्रुवारी ते मे या कालावधीत पाणी उपलब्ध राहील, याची खात्री करावी. गतवर्षीप्रमाणेच धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन समन्वयाने करावे. नदी, कालवा आणि नाला परिसरातील अतिक्रमणे व राडारोडा काढण्याची कार्यवाही करावी, तसेच नैसर्गिक जलस्रोत सुरळीत राहतील याची दक्षता घ्यावी. धरणांच्या सुरक्षिततेचा आढावा घेऊन बांधकाम आणि कालव्यांची तपासणी करावी. गतवर्षीच्या तपासणीनुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल एप्रिल अखेरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक ठिकाणे, गावे, पूल, रस्ते आणि पूरबाधित गावांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात. गतवर्षीच्या तपासणीनुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल एप्रिल अखेरपर्यंत सादर करावा. पावसाळ्यात रस्ते बंद झाल्यास पर्यायी मार्गांची माहिती नागरिकांना द्यावी. आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणारी बुलडोझर्स, वॉटरटँकर्स, डंपर्स, अर्थमुव्हर्स, डिवॉटरींग पंप्स, जनरेटर्स, ट्री कटर्स, फ्लड लाईट, आर.सी.सी. कटर्स यांसारखी सर्व उपकरणे सुस्थितीत असल्याची खात्री करण्याचे निर्देशही देण्यात आले. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींनी त्यांच्या हद्दीतील धोकादायक इमारतींची तपासणी करावी. अशा इमारतींमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे. तसेच, जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांच्या हद्दीतील अनधिकृत जाहिरात फलके एका महिन्याच्या आत काढून टाकण्याचे आदेश दिले. पावसाळ्यात पर्यटनस्थळे बंद केली जाणार नाहीत, त्यामुळे सुरक्षा लक्षात घेऊन पोलीस, वन, पर्यटन आणि पुरातत्व विभागाने पर्यटनस्थळी एकाच वेळी किती पर्यटकांना प्रवेश द्यावा, याबाबत नियोजन करावे. पर्यटनस्थळांवर आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
Source link
एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पर्जन्यमान:पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे प्रशासनाला निर्देश