![]()
बुलढाणाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कालच (गुरुवारी) कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबी यांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणाची ऑडिओ क्लिप देखील चांगलीच व्हायरल झाली. याच्या विरोधात आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रशांत आंबी यांच्यासह त्यांचे कुटुंब व इतर नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोहित पवार राजारामपुरी पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांना म्हणाले, तुम्हाला माहीत असेल संध्याकाळची वेळ होती आणि प्रशांत आंबी हे सर्वसाधारण कुटुंबातून येतात. त्यांना आमदारांचा फोन आला आणि भाषा कुठल्या पद्धतीची वापरली त्यात महिलांचा अवमान झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान झाला आणि त्यानंतर पानसरे यांचा उल्लेख करत असताना त्यांचा देखील अपमान करण्यात आला आणि अतिशय गलीच्छ भाषा वापरण्यात आली. मी तिथे येईल, मी बघेल अशा प्रकारची दमदाटी करण्यात आली. एफआयआर दाखल करावा पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, आता या पुस्तकाविषयी तर म्हणजे माझे जेवढे वय आहे त्यापेक्षा जुने हे पुस्तक आहे. पुस्तक वाचले तर शिवाजी महाराजांचे कर्तुत्व तुम्हाला लक्षात येईल. तिथून हा विषय सुरू झाला आणि त्यानंतर काल प्रशांत आंबी आपल्याकडे आले आणि विविध कलामांच्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी विनंती केली. ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर स्वतः आमदारांनीच त्याचे क्लॅरिफिकेशन केले आणि मान्य केले की हो मीच कॉल केला होता. फोन केला होता हे त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी तिथेच काही थांबवलेले नाही. आता या सगळ्यांची मागणी आहे तसेच जेवढे कोणी महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचे लोक आहेत त्या आमच्या सगळ्यांची मागणी आहे की महिलांच्या बाबतीत ज्या खालच्या भाषेत बोलले गेले, पानसरे साहेबांविषयी बोलले गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाही जो अवमान त्यांनी केला या सगळ्या गोष्टी गृहीत धरून प्रशांत आंबी यांचा एफआयआर तुम्ही स्वीकारावा अशी तमाम सुसंस्कृत लोकांची मागणी आहे. तसेच त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात अडचण काय आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, प्रशांत आंबींच्या पत्नीची मागणी यावेळी प्रशांत आंबी यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या, त्या म्हणाल्या, एफआयआर दाखल करून घ्यायला इतका वेळ का लागतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच त्या म्हणाल्या, औरंग्याची अवलाद म्हणणे, शिवाजी महाराज तुझ्या आईचा नवरा होता असे म्हणणे, याच्यापेक्षा दंगल घडवायला अजून काय अपेक्षित आहे तुम्हाला? काल यानंतर सुद्धा दोन कॉल आले, दोन्ही कॉलमध्ये आईबद्दल, बायकोबद्दल एकदम अश्लील बोलले गेले, त्यामुळे विनयभंगाचा गुन्हा दाखल करा अशी आमची मागणी आहे. तो म्हणाला तुझ्या घरी शंभर लोक पाठवतो, आम्ही घरात राहतो, आमच्यासोबत असे काही झाले तर याला कोण जबाबदार आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
Source link
संजय गायकवाडांवर FIR दाखल करण्यात अडचण काय?:रोहित पवारांचा सवाल; पवार प्रशांत आंबींसह राजारामपुरी पोलिस ठाण्यात