![]()
यंदा एल-निनोमुळे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी राहिले आहे. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे, या संकट काळात राज्य शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त लातूर येथील सोहळ्यात बोलताना म्हटले आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा सुवर्णदिवस आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील या ऐतिहासिक लढ्यात लातूरच्या अनेक थोर स्वातंत्र्यसेनानींनी आणि सामान्य जनतेने दिलेले योगदान व त्यांचा त्याग प्रेरणादायी आहे. रझाकार आणि निजाम सैन्याविरुद्ध लातूर जिल्ह्यात औराद, निलंगा, हाडोळी, बोटकुल, हत्तीबेट, रामघाट, अंबुलगा, तोंडचीर आणि घोणसी यासारख्या विविध ठिकाणी लढाया झाल्या. शेतकरी, विद्यार्थी, महिला, कामगार यांनी या लढ्यात सहभाग घेतला. या लढ्याला भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभ पटेल यांच्या मध्यस्थीने यश मिळाले. 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलिस ॲक्शन सुरू झाले आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. या गौरवशाली इतिहासाला साक्षी ठेवून लातूर जिल्ह्याच्या विकासाठी प्रयत्नशील आहोत. सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, शेतकरी हिताला प्राधान्य देत शासनाने विविध योजना राबविल्या असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल 63,127 शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहचला आहे. तसेच जिल्ह्यात परतीच्या पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास जिल्ह्यात टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण होणार असल्याने सध्याच्या परिस्थिती पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. टंचाई काळात पशुधनासाठी चारा उपलब्ध होईल, याचेही नियोजन करण्यात येत आहे. सध्याच्या स्थितीत सर्वांनीच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. 13 ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ’ शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संविधानिक पदावरील 25 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरदरम्यान सेवा संकल्प अभियान राबवले जाणार असून या अभियानात सहभागी होवून नागरिकांनी विविध सरकारी सेवा, योजनांचा लाभ घ्यावा. तसेच देशातील युवकांना रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या 29 सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी 13 ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘रोजगार महाकुंभ’ चे आयोजन करण्यात आले असून यात जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवावा. जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवून गावागावात स्वच्छतेची नवी चळवळ उभी करावी व आपले गाव स्वच्छ व सुंदर बनवावे, असे आवाहन करत लातूरच्या प्रगती आणि समृद्धीसाठी सर्वांनी एकजुटीने व निष्ठेने प्रयत्न करण्याचा निर्धार पालकमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
Source link
एल-निनोमुळे पिकांचे नुकसान, संकटकाळात बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू:लातूर जिल्ह्यातील 63 हजारहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले