Headlines

एसटीच्या तुघलकी निर्णयाने सुरू झाली प्रवाशांची परवड:एनसीएमसी कार्डच्या अर्धवट अंमलबजावणीविरुद्ध संताप‎




पूर्वकल्पना न देता, पूर्वतयारी न करता एसटी महामंडळाने १ सप्टेंबरपासून लागू केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) च्या निर्णयामुळे राज्यात गोंधळ उडाला. या निर्णयाने ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, लहान मुलांना प्रवास दरात दिली जाणारी सुट जवळपास संपुष्टात आली. त्यामुळे हा तुघलकी निर्णय परत घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केली. यासंदर्भात त्यांनी विभागीय नियंत्रकांमार्फत महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन पाठवले. एक सप्टेंबरपासून कार्ड सक्ती लागू झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची तारांबळ उडाली. वाहकांकडील ई-टीआयएम मशिन्स अपडेट नाहीत, अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्याने तिकिटेच निघत नाहीत. प्रवाशांकडे रोख रक्कम असतानाही वाहक पैसे स्वीकारण्यास नकार देत आहेत. ज्या प्रवाशांकडे एनसीएमसी कार्ड आहे, त्यांचे रिचार्ज करताना अडथळे येत आहे. अनेकदा खात्यातून पैसे कापले जातात; पण तिकीट मात्र जनरेट होत नाही. यामुळे एसटी प्रवासात रोज वाहक, प्रवाशांत वाद होत असून, एसटी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे महामंडळाची जनमानसात मोठी बदनामी होत आहे. दरम्यान सवलतीचे तिकीट बंद झाल्यामुळे प्रवाशांवर नाईलाजाने पूर्ण तिकीट काढण्याची सक्ती केली जात असून, हा एकप्रकारे प्रवाशांच्या खिशावर मारलेला दरोडाच असल्याचा सवाल कांबळे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे एनसीएमसी कार्डच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी अन्यथा महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. या वेळी पुरुषोत्तम मेश्राम, संदीप हगवणे, विशाल कांबळे, प्रशांत शेंडे उपस्थित होते. ही आहे खरी अडचण महिला सन्मान योजनेअंतर्गत त्यांना ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिकांना ५० ते १०० टक्के मोफत प्रवास, दिव्यांग, विद्यार्थी व लहान मुलांच्या सवलतीचे पर्यायच सध्याच्या अपडेट नसलेल्या मशिन्सवरून गायब झाले आहेत. मशिन्समध्ये महिला सवलतीचे बटणच बंद केल्याचा प्रकारही समोर आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *