Headlines

'ऑपरेशन टायगर'च्या बातमीने ठाकरे गटात अस्वस्थता:बातमी देणाऱ्या वृत्तपत्रावर करणार कायदेशीर कारवाई; ठाकरे – अरविंद सावंतांत चर्चा




सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 8 खासदारांची गुप्त बैठक झाल्याच्या वृत्ताने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे व संबंधित खासदारांनी अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचा दावा करत हे वृत्त फेटाळून लावली आहे. पण यामुळे ठाकरे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षाने हे वृत्त देणाऱ्या वृत्तपत्रावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी ठाकरे गट लवकरच ठोस पाऊल उचलणार आहे. खासदार संजय राऊत यांनी एका पोस्टद्वारे स्वतः याचे संकेत दिलेत. मुंबई स्थित एका वृत्तपत्राने नुकतेच एकनाथ शिंदे व ठाकरे गटाच्या 8 खासदारांची गुप्त बैठक झाल्याचे वृत्त दिले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बुधवारी रात्री अचानक ताफा सोडून वेगळ्या मार्गाने गेली. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात शिंदेंनी ठाकरे गटाच्या 8 खासदारांची भेट घेतली. त्यांच्यातील बैठक गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू होती. या बैठकीला एकनाथ शिंदेंसोबत त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदेही हजर होते, असा दावा या वृत्तात करण्यात आला होता. या वृत्तामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर अरविंद सावंत व ओमराजे निंबाळकर यांनी हे वृत्त जोरकसपणे फेटाळून लावले होते. संबंधित वृत्तपत्रावर होणार कायदेशीर कारवाई या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाने संबंधित वृत्तपत्रावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. खासदार अरविंद सावंत यांनी शनिवारी तातडीने मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट गेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. त्यात कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना चुकीचे वृत्त छापून बदनामी केल्याप्रकरणी संबंधित वृत्तपत्राला नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. खासदार संजय राऊत यांनी एका ट्विटद्वारे या संभाव्य कारवाईची माहिती दिली. ते आपल्या पोस्टमध्ये संबंधित वृत्तपत्राची बातमी पोस्ट करत म्हणाले, या वृत्तपत्राने आणि बातमीदाराने कायदेशीर कारवाई ची तयारी ठेवावी. होय. यापुढे अशा गुन्ह्यांना माफी नाही. enough is enough! कथित बैठकीला कोणकोणते खासदार होते हजर? प्रस्तुत बातमीनुसार, सदर बैठकीला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे हे 6 खासदार प्रत्यक्ष हजर होते. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह 2 खासदार व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून हजर होते. या बैठकीत शिंदेंनी या खासदारांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली. पण नंतर त्यांनी ती फेटाळून लावली. अरविंद सावंत, ओमराजेंनी फेटाळले वृत्त पत्रकारांनी याविषयी ओमराजे निंबाळकर व अरविंद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचा दावा केला. काहीही झाले तरी मी शिंदेंसोबत जाणार नाही, असे सावंत यांनी या प्रकरणी ठणकावून सांगितले. तर ओमराजेंनी मी चुकीच्या बातमीवर स्पष्टीकरण देत बसणार नाही, असे स्पष्ट केले. मी दोन टर्मचा खासदार आहे. माझ्या दोन टर्मपासून हीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे मी चुकीच्या बातमीवर स्पष्टीकरण देणार नाही. अशी कोणती बैठक झाल्याचे मला माहिती नाही. बैठक झाली असेल, तर तिचे बैठक द्यावेत, असे ते म्हणालेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *