![]()
औंढा नागनाथ शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात असलेल्या दुकानांना आग लागून सहा दुकाने जळून खाक झाली आहेत. शुक्रवारी ता. 30 सकाळी हि घटना घडली आहे. औंढा नागनाथ व हिंगोलीच्या अग्नीशमनदलाने दोन तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला आहे. शॉर्ट सर्क्रिटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीमध्ये हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ शहरातील जुन्या बसस्थानकाच्या परिसरात मोबाईल विक्री व दुरुस्ती, बॅटरी दुरुस्ती, इलेक्ट्रीकल्स साहित्य विक्री व दुरुस्तीची दुकाने आहेत. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका दुकानातून अचानक धुर निघू लागला होता. या परिसरात असलेल्या हॉटेल चालकांनी दुकानातून धुर निघत असल्याचे लक्षात येताच मदतीसाठी आरडा ओरड केली. त्यानंतर परिसरातील नागरीक मदतीसाठी धावले. पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आयुब शेख, उपनिरीक्षक शेख खुद्दूस, जमादार ज्ञानेश्वर सावळे, अमोल चव्हाण, अनिल नागुलवार, दिनकरपोले, वसंत चव्हाण, रवीकांत हरकाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या मार्गावरील वाहतुक काही काळ थांबवून तातडीने हिंगोली व औंढा नागनाथ येथील अग्नीशमनदलास पाचारण केले. दरम्यान,दोन तासानंतर म्हणजेच सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली. मात्र तो पर्यंत सहा दुकाने जळून खाक झाली होती. या आगीमध्ये सरफराज पठाण, अखिल पठाण, नामदेव कोकाटे, सतीष बेद्रे, अब्दुल कदिर, रामभाऊ साळुंके यांच्या दुकानांचे नुकसान झाले असून हजारो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे हि आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिस व नागरीकांनी तातडीने मदतीसाठी धावाधाव केल्याने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविता आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. महसूल विभागाच्या पथकाने पंचनाम्याची तयारी चालविल्याचे सुत्रांनी सांगितले.
Source link
औंढा नागनाथमध्ये भीषण आग, 6 दुकाने खाक:नागरिकांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ, 2 तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण