Headlines

कर्जमुक्तीसाठी सरकारविरोधात संतापाचा उद्रेक!:आंदोलक शेतकऱ्याने दुचाकी पेटवली; नेत्यांच्या गाड्या जाळण्याचा इशारा




कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र, या कर्जमाफीत लादण्यात आलेल्या जाचक अटी आणि शर्तींमुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडल्याच आरोप केला जात आहे. कोणत्याही अटीविना ‘सरसकट कर्जमाफी’ मिळावी, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनांचे लोण पसरत असून, वाशिम जिल्ह्यातील अडोळी येथे एका संतप्त शेतकऱ्याने शासनाचा निषेध करत भररस्त्यात स्वतःची दुचाकी पेटवून दिली आहे. “शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या, अन्यथा यापुढे नेते आणि अधिकाऱ्यांच्या गाड्या पेटवायला मागेपुढे पाहणार नाही,” असा आक्रमक इशाराही या आंदोलकांनी दिला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच लागू केली जाणार आहे. मात्र, शासनाने या योजनेत अनेक तांत्रिक अटी घातल्याने बहुतांश गरजू शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर विविध शेतकरी संघटनांनी या निर्णयाला कडाडून विरोध करत, सरसकट कर्जमाफीची आग्रही मागणी लावून धरली आहे. याच मागणीसाठी काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरात ‘अन्नत्याग आंदोलन’ केले होते. तर आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे मोठे आंदोलन छेडले असून, त्याला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तुपकरांच्या समर्थनार्थ स्वत:ची दुचाकी जाळली रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील क्रांतिकारी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. वाशिमच्या अडोळी येथे या संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी सतीश इडोळे या तरुण शेतकऱ्याने संतापाच्या भरात स्वतःची लाख मोलाची दुचाकी भरचौकात आणून तिला आग लावली. कर्जाच्या डोंगराखाली पिचलेल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल, तर सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी एकमुखी मागणी यावेळी इडोळे आणि उपस्थित आंदोलकांनी केली. जळणाऱ्या दुचाकीच्या ज्वालांमधून जणू शेतकऱ्यांच्या मनातील खदखदच रस्त्यावर उतरल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. नेते आणि अधिकाऱ्यांच्या गाड्या पेटवू! दुचाकी पेटवल्यानंतर आंदोलकांनी सरकारला थेट निर्वाणीचा इशारा दिला. “शासनाने शेतकऱ्यांच्या संयमाचा अधिक अंत पाहू नये. आज आम्ही स्वतःच्या गाड्या पेटवत आहोत, पण जर सरकारने आमच्या मागण्यांकडे काणाडोळा केला, तर हे आंदोलन अधिक उग्र रूप धारण करेल. यापुढील काळात आम्ही लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या भररस्त्यात पेटवायलाही मागेपुढे पाहणार नाही,” असा सज्जड दम आंदोलकांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *