![]()
हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा शिवारात कारमधून आलेल्या चोरट्यांनी तीन शेतकऱ्यांच्या मालकिच्या सहा शेळ्या व दोन बोकड पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 12 गुन्हा दाखल झाला आहे. तर चोरट्यांनी वापरलेली कार देखील चोरीची असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत जनावरे चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यामध्ये जनावरांना इंजेक्शन देऊन त्यांना कारमधून पळवून नेत असल्याचे स्पष्ट झाले होते. हिंगोली शहरातून जनावरे चोरीनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जनावरे चोरणाऱ्या टोळीला इनोव्हा कारसह पकडले होते. त्यामुळे जनावरे चोरीसाठी कारचा वापर केला जात असल्याचे स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे कार ने प्रवास करतांना कोणाला शंका येत नसल्याने जनावरे तस्करांनी हा फंडा वापरला होता. दरम्यान, हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा शिवारात मंगळवारी ता. 12 पहाटेच्या सुमारास एक कार गावात आली. यावेळी कारमधील चोरट्यांनी दीपक गाढवे यांच्या मालकिच्या तीन शेळ्या व एक बोकुड, दत्तप्रसाद कुरवाडे यांच्या मालकिच्या दोन शेळ्या व गुलाब गाढवे यांच्या मालकिचे एक शेळी व एक बोकूड चोरट्यांनी पळविले. दरम्यान, चोरटे शेळ्या व बोकूड एका कारमध्ये टाकत असतांना त्यांना एका महिलेने पाहिले. त्यानंतर आरडा ओरड सुरु झाली. त्यामुळे चोरट्यांनी कारसह पलायन केले. या प्रकरणी दीपक गाढवे यांच्या तक्रारीवरून कारमधील (एमएच-42-के-3401) चोरट्यां विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, जमादार अस्लम गारवे पुढील तपास करीत आहे. तर सदर कार चोरीची असावी किंवा त्यावर बनावट क्रमांक टाकण्यात आला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Source link
कळमकोंडा शिवारात कारमधून आलेल्या चोरट्यांनी सहा शेळ्या-दोन बोकड पळविले:हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, कारदेखील चोरीची असल्याचा संशय